शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करा; मनविसेचा आंदोलनाचा इशारा
- शिक्षण मंडळातील प्रभारी प्रशासन अधिका-याला दिले निवेदन
पिंपरी – महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करून अशा शाळांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी शहर सेनेने केली आहे. यादी जाहीर न केल्यास मनविसेतर्फे प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षण मंडळाला दिला आहे.
यासंदर्भात मनविसेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे यांनी शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अनेक शाळांच्या इमारती बेकायदेशीर बांधल्या आहेत. अशा अनधिकृत इमारतींमध्ये शैक्षणिक संस्थांकडून अद्यापनाच्या नावाखाली शिक्षणाचा धंदा मांडला गेला आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार शिक्षण मंडळ आणि महापालिका प्रशासन आहे.
शहरात अनधिकृत शाळा किती आहेत. त्यामध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान आणि पालकांची शैक्षणिक संस्थांकडून होणारी फसवणूक कोण रोखणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकांची फसवणूक रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने अनधिकृत शाळांची यादी जाहीर करावी, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष डांगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.