breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांच्या ‘त्या’ इच्छेवर आदित्य ठाकरे म्हणाले, “बाबा, तुम्ही हे चॅलेंज स्वीकारलं पाहिजे”

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात वेगळ्या राजकारण बघायला मिळालं. निकालानंतर ताणलेले शिवसेना भाजपाचे संबंध. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिलेला पाठिंबा. चार दिवसात कोसळेलं भाजपाचं सरकार आणि महाविकास आघाडी आकारास येऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. असा जवळपास महिनाभर चालेल्या या घटनाक्रमातील पडद्यामागे घडलेल्या एक एक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. त्यातच मुख्यमंत्रिपदासाठी अचानक उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे कसं आलं? त्यावेळी नेमकं काय झालं, हे आता समोर आलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपापासून दूर झाली. त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असं राजकीय समीकरण मूळ धरू लागलं होतं. ११ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वांद्रेतील ताज लँडस् एंड हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे व दिलीप वळसे-पाटील हे उपस्थित होते. त्या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सरकार स्थापन करण्याबद्दल चर्चा झाली. हे सरकार स्थापन होईल याबद्दल शरद पवारांना खात्री होती. पण, त्यांच्या मनात मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल विचार सुरू होता.

ही बैठक संपल्यानंतर शरद पवार सरकत्या जिन्यानं खाली उतरत होते. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांना ‘आपण एकत्र येऊन सरकार स्थापन करत आहोत, हे सर्व ठिक आहे. पण, नेता कोण असेल? मुख्यमंत्री कोण असणार? काही नाव मी ऐकली आहेत, पण ती नाव स्वीकारता येण्यासारखी नाही. सरकारचं नेतृत्व करायला आदित्य ठाकरे खूप लहान आहेत. अजित पवार व इतर वरिष्ठ नेते त्याच्या नेतृत्वाखाली काम नाही करू शकत. एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची नाव आमच्याकडे स्वीकारली जाणार नाहीत,’ असं सांगत पवार यांनी संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्या नावाची हिंट दिली.

त्याचक्षणी संजय राऊत उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे बसलेल्या रुममध्ये पोहोचले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं की, “शरद पवार सरकार स्थापन करण्यास तयार आहेत, पण त्यांच प्रश्न मुख्यमंत्रिपदाबद्दल आहे. सध्या मुख्यमंत्रिपदासाठी जी नाव चर्चेत आहे, ती त्यांना मान्य नाहीत. त्यांची इच्छा आहे की, तुम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं,” असं राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर टाकलं. त्यानंतर उद्धव ठाकरे थोड अवघडत बोलले की, “मी कोणत्याही सरकारमध्ये नव्हतो.” त्यावर राऊत म्हणाले,”जर तुमची इच्छा असेल की, मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, तर तुम्हाला स्वतःला तयार करावं लागेल, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पाठिंबा देणार नाही,” असं राऊत यांनी सांगून टाकलं.

ही सगळी चर्चा आदित्य ठाकरे हे ऐकत होते. राऊत यांनी बोलणं थांबवताच आदित्य उद्धव ठाकरे यांना म्हणाले,”बाबा, तुम्ही चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व केलं पाहिजे. तुम्ही हे सगळं राज्य आणि पक्षाच्या भविष्यासाठी करायला हवं,” असं आदित्य म्हणाले. या घटनेनंतर मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव निश्चित झालं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसनं महाविकास आघाडीच्या नव्या समीकरणातून एकत्र येत महाराष्ट्रात सरकार स्थापनं केलं. या सरकारला आता सहा महिने पूर्ण झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button