breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वैयक्तीक आकसापोटी आरोप; अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

  • अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचा कथीत गैरव्यवहार
  • बँकेची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत
  • आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी अध्यक्ष लांडे यांचा खुलासा

पिंपरी – सध्यस्थितीत अण्णासाहेब मगर सहकारी बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. तरीही, पराभूत पॅनेलमधील माजी पदाधिका-यांनी वैयक्तीक आकसापोटी आरोप केले आहेत. बँकेत कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार अथवा अधिक खर्च झालेला नाही. असा खुलासा बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी शुक्रवारी (दि. 8) पत्रकार परिषदेत केला. याबाबत न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे लांडे यांनी सांगितले.

मगर बँकेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती देण्यासाठी सोमवारी (दि. 4) बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या संचालक मंडळावर आरोप केले. राहूल गव्हाणे यांनी बँकेच्या कामकाजात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. त्यासंदर्भात असंख्य आरोप करण्यात आले. या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने आज पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.

बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे म्हणाले की, 2010 मध्ये बँकेच्या ठेवी 60 कोटी 93 लाख होत्या. मार्च 2018 अखेर ठेवी 204 कोटी 61 लाख झाल्या. सभासद कर्जे 37 कोटी 33 लाख होते. मार्च 2018 अखेर 114 कोटी 36 लाख एवढे कर्ज झाले. गुंतवणूक 26 कोटी होती. मार्च 2018 अखेर ती 84 कोटी 20 लाख आहे. बँकेच्या फक्त तीन शाखा होत्या. आजरोजी एकूण 10 शाखा कार्यरत आहेत. बँकेची इमारत बांधण्यासाठी भूमीपूजन केले. इमारतीचे नकाशे मंजूर करून बांधकाम सुरू केले. ठेकेदारांची नियुक्ती व मोटार खरेदी केले. सभासदांना कर्जवाटप केले, कर्मचा-यांना पदोन्नती दिल्या. यावेळी बाळासाहेब गव्हाणे हे बँकेच्या संचालक मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत होते. हे निर्णय घेताना त्यांनी त्यावेळेस विरोध करणे संयुक्तीक ठरले असते.

बँकेचे सहकार खात्याने सहकार कायदा कलम 81 अंतर्गत चाचणी लेखापरिक्षण केले आहे. त्याचा तपासणी अहवाल बँक दप्तरी प्राप्त आहे. या अहवालावर बँकेने दोषदुरूस्ती करून तो अहवाल सहकार खात्याला सादर केला आहे. या दोषदुरूस्ती अहवालाची पुर्तता झाली की नाही, याची तपासणी करण्यासाठी कलम 83 अन्वये चौकशीचे पत्र सहकार आयुक्तांनी बँकेला दिले आहे. चौकशीत सत्य परिस्थिती समोर येणार आहे. तथापि, बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे, असे अध्यक्ष लांडे यांनी सांगितले. तसेच, बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी संचालक विजय गवारे, दीपक डोळस, मनोज बोरसे, गणेश पवळे आदी परिषदेत उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button