breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वीजपुरवठा खंडित प्रकरणी ऐरोली येथील राज्य भार प्रेषण केंद्राची ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडून पाहणी

मुंबई – मुंबई, नवी मुंबईसह ठाणे क्षेत्रात वीज पुरवठा खंडित होण्याची घटना 12 ऑक्टोबरला घडली. त्यावेळी मुंबईची आयलँडिंग यंत्रणा कार्यान्वित झाली नसल्याने रेल्वेसह अत्यावश्यक सेवेचा वीजपुरवठाही काही कालावधीसाठी बंद झाला होता. या घटनेची ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी ऐरोली येथील राज्य भार प्रेषण केंद्राला (एसएलडीसी) भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या चारपैकी तीन 400 केव्ही लाईन बंद पडल्याने आणि चौथी लाईन अतिरिक्त भार आल्यामुळे बंद करावी लागली तसेच त्याचवेळी आयलँडिंग यंत्रणा सुरू होणे अपेक्षित असताना ती सुरू न झाल्याने वीजपुरवठा ठप्प झाला होता. भार प्रेषणामध्ये एसएलडीसीची मोलाची भूमिका असते. त्याअनुषंगाने त्या दिवशीचा घटनाक्रम आणि एसएलडीसीचे कामकाज कसे चालते याची माहिती घेण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी सोमवारी येथे भेट दिली. यावेळी टाटा वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर मुंबईची आयलँडिंग यंत्रणा नेमकी काय आहे आणि दि. 12 ऑक्टोबर रोजी काय घडले याचे सादरीकरण केले.

मुंबईला बाहेरून सुरळीत वीजपुरवठा करणे आणि बाहेरुन होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्यावर मुंबई शहराला अतिरिक्त वीज पुरवठा करण्यासाठी आयलँडिंग यंत्रणा सुरळीत ठेवणे आवश्यक असताना ती सुरू होऊ शकली नाही. या बाबीतील त्रुटी शोधून अहवाल सादर करण्यासाठी तांत्रिक लेखापरीक्षण समिती नेमली आहे. त्यांच्या अहवालानुसार दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे डॉ.राऊत यांनी सांगितले.

यावेळी बैठकीला ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्यासह ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, संचालक संजय ताकसांडे, तांत्रिक सल्लागार उत्तम झाल्टे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button