breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विसर्जनादरम्यान विसर्जनस्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव विसर्जनादरम्यान विसर्जनस्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. कृत्रिम तलाव, फिरत्या तलावांसह यंदा ४४५ विसर्जनस्थळे सज्ज ठेवण्यात आली आहे.कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव विसर्जनादरम्यान विसर्जनस्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. कृत्रिम तलाव, फिरत्या तलावांसह यंदा ४४५ विसर्जनस्थळे सज्ज ठेवण्यात आली आहे. विसर्जनासाठी पालिकेचे सुमारे २३ हजार कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. विसर्जनादरम्‍यान नागरिकांनी सुरक्षित वावर, मास्‍क, सॅनिटायझरचा वापर, तसेच आरोग्‍याशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाद्वारे करण्‍यात आले आहे.

दरवर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा उत्सवावर करोनाचे सावट असल्याने साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. गर्दी टाळण्यासाठी आगमन, विसर्जन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. विसर्जनासाठी पालिकेने विभागांमध्ये कृत्रिम तलाव तयार केले आहेत. अधिकाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात किंवा घरच्या घरी, सोसायटीच्या आवारात करावे, असे आवाहन पालिकेने केले होते. या आवाहनाला दीड ते सात दिवसांच्या गणपतीत भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांना थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे. नैसर्गिक विसर्जनस्थळांपासून एक ते दोन किमी अंतरातील गणेशभक्तांनी आपल्या मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक विसर्जनस्थळी उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे आपल्या मूर्ती विसर्जनासाठी द्यावयाच्या आहेत. नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवर महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देऊन मूर्तीसंकलनाची व्‍यवस्‍था उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे.

१६८ कृत्रिम तलाव

नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी पालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १६८ कृत्रिम तलाव बांधण्यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवर जाण्‍यास मनाई असल्‍याने कृत्रिम तलावाचा वापर लगतच्‍या भाविकांनी करणे बंधनकारक आहे.

प्रत्येक विभागात मूर्तीसंकलन केंद्र

पालिकेच्‍या प्रत्‍येक विभागांतर्गत ७ ते ८ गणेशमूर्तींचे संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत. त्‍याची माहिती तसेच कृत्रिम तलावांची माहिती पत्त्यासह तसेच गुगल लोकेशनसह पालिकेच्‍या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.

सील इमारतीतील विसर्जन घरातच

प्रतिबंधित क्षेत्रामध्‍ये असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तींचे विसर्जन मंडपातच करावे किंवा विसर्जन पुढे ढकलावे. सील केलेल्या इमारतींमधील गणेशमूर्तींचे विसर्जन घरीच करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आरती घरी/मंडपातच

मूर्तीसंकलन केंद्र, कृत्रिम तलाव किंवा नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवर उपलब्‍ध पालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करून घेणे बंधनकारक आहे. पालिकेने विशेष व्‍यवस्‍था म्‍हणून ट्रकवर टाक्‍या किंवा इतर व्‍यवस्‍था करून फिरती विसर्जनस्‍थळे निर्माण केली आहेत.

मिरवणुकीला परवानगी नाही

यंदाच्या गणेशोत्‍सवादरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी देण्यात आलेली नाही. याचीदेखील भाविकांनी नोंद घ्‍यावी. विसर्जनादरम्‍यान सुरक्षित वावर, मास्‍क, सॅनिटायझर वापरणे, आरोग्‍याशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाद्वारे करण्‍यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button