breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

विश्वासघात, खंजीर खुपसणे हे शब्द ढोंगी योगींच्या तोंडी शोभत नाही- उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही, असे विधान करुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या योगी आदित्यनाथांवर शिवसेनेने पलटवार केला. विधान परिषद निवडणुकीत कोकण आणि नाशिकमध्ये शिवसेनेविरोधात राष्ट्रवादीशी केलेली युती हा कोणाच्या पाठीत खंजीर होता, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. त्यामुळे विश्वासघात, खंजीर खुपसणे हे शब्द योगी आदित्यनाथ किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत त्यांच्या हयातीत खंजीर खुपसले त्यांच्या हातांना भाजपाने ‘मेहंदी’ लावून नवरदेव बनवले. त्यामुळे विश्वासघात, खंजीर खुपसणे हे शब्द योगी आदित्यनाथ किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाहीत, असे शिवसेनेने सुनावले आहे. अफझलखानाने शिवरायांच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवरायांनी सरळ समोरून खानाचा कोथळाच काढला. ज्यांना शिवरायांना हार घालण्याआधी पायातल्या चपला काढता येत नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची, असे ‘सामना’च्या अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे.

 काय आहे आजचे सामना संपादकीय?
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल लागले आहेत. शिवसेनेचा पराभव व्हावा यासाठी ‘बेइमान’ युत्या आणि आघाडय़ा झाल्या. पालघरात शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहे. याचा बदला म्हणून नाशकात ‘भाजप’वाले राष्ट्रवादीच्या शेजेवर चढले. कोकण मतदारसंघात ते वेगळाच दशावतार करू लागले. परभणी, हिंगोलीतली पावलेही तशी वाकडीच पडत होती. हे सर्व हलाहल पचवून शिवसेनेने नाशिक ठासून जिंकले व परभणी-हिंगोली खेचून जिंकले. बेइमानी राजकारण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या मतदारांनी साफ उपडे केले. परभणीत शिवसेनेचे विप्लव बाजोरिया जिंकले. त्यांनी ऐनवेळेस निवडणुकीत उडी घेतली व विजय मिळविला. शिवसेनेच्या मतदारांची संख्या कमी असतानाही हा विजय मिळवून अनेक राजकीय चाणक्यांना मात दिली. नाशकात शिवसेनेची २०७ मते असताना शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांना ३९९ मते पडावीत हा चमत्कार म्हणायला हवा. येथे भारतीय जनता पक्षाने ऐन वक्तास राष्ट्रवादीचा मुका घेतला, पण मुका नीट घेता आला नाही व उमेदवाराच्या ओठाचा लचका पडला. शिवसेनेच्या विरोधात जितके ‘डाव’ टाकाल तितकी शिवसेना जेरात पुढे जाईल. एका मजबुतीने आगीच्या लोळातून तावूनसुलाखून बाहेर पडेल. उत्तर प्रदेशचे ढोंगी मुख्यमंत्री पालघरात प्रचारास आले व तोफांतून पिचकाऱ्या मारून गेले.

काय, तर म्हणे शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेब असते तर असे घडले नसते, अशा पिचकाऱ्या सोडणाऱ्यांना इतिहास किंवा छत्रपती समजलेच नाहीत. एखाद्या बेफाम माथेफिरू खुन्याप्रमाणे भाजप सध्या दिसेल त्याच्या पाठीत खंजीर खुपसत आहे व त्याबाबतची वृत्ते रोजच प्रसिद्ध होत आहेत. पालघरात शंभर नंबरी काँगेसवाल्या राजेंद्र गावितांना उमेदवारी देणे व त्यांच्या प्रचारासाठी येऊन शिवसेनेवर आग्यावेताळाप्रमाणे बोलणे यास पाठीत खंजीर खुपसणे नाही म्हणावे तर काय म्हणावे? अगदी कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा स्वतः भाजपने एकवेळ लढवली असती तरी आम्ही समजू शकलो असतो, पण शिवसेनेच्या विरोधात या जागेचा अफझलखानी नजराणा ज्यांना बहाल केला तो काय म्हणून घ्यायचा? ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत त्यांच्या हयातीत खंजीर खुपसले त्याच हातांना तुम्ही ‘मेहंदी’ लावून नवरदेव बनवलेत ना? त्यामुळे घात, विश्वासघात, खंजीर खुपसणे वगैरे शब्द योगी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाहीत. आम्ही निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. मग पालघरची लोकसभा पोटनिवडणूक असो की कालची विधान परिषदेची निवडणूक. ही उद्याच्या लढाईची सुरुवात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button