breaking-newsपुणेमहाराष्ट्र

विश्वाच्या उत्पत्तीची संकल्पना बदलावी लागेल

डॉ. जयंत नारळीकर यांचे मत

विश्वाच्या उत्पत्तीविषयी विज्ञानात अनेक मतप्रवाह आहेत. बिग बँगपासून विश्व अस्तित्वात आले अशी संकल्पना मांडण्यात आली. मात्र, या संकल्पनेबाबत अनेक प्रश्न आहेत. त्या सर्वाची उत्तरे आपल्याला मिळविता आली पाहिजेत. महास्फोट कशामुळे झाला, त्यातून काय बाहेर आले याचे उत्तरच आपल्याकडे नाही. त्यामुळे जिथे उत्तरे मिळत नाहीत, तिथे भौतिक विज्ञान लागू होत नाही. म्हणूनच येत्या काळात आपल्याला बिग बँग ही संकल्पना बदलावी लागणार आहे, असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘विश्वाच्या उत्पत्तीविषयी काही विचार’ या विषयावर नारळीकर यांचे व्याख्यान झाले. त्यापूर्वी न्या. महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केलेल्या वक्तृत्वोत्तेजक सभा, पुणे सार्वजनिक सभा, वेदशास्त्रोत्तेजक सभा, सेवासदन सोसायटी,  पुणे प्रार्थना समाज आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा या संस्थांतर्फे डॉ. नारळीकर यांना न्या. रानडे स्मृती पुरस्कार डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात  आला. डॉ. मंगला नारळीकर, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे डॉ. अविनाश चाफेकर, पुणे प्रार्थना सभेचे डॉ. दिलीप जोग आणि सेवासदन संस्थेचे चिंतामणी पटवर्धन या वेळी उपस्थित होते.

नारळीकर म्हणाले,‘ विश्वाच्या उत्पत्तीचे कोडे उलगडत आले असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. मात्र, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.  विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध करावी लागते. ते सिद्ध होत नसेल, तर पुढे जाता येत नाही. बिंग बँग संकल्पनेतून विश्वाची उत्पत्ती झाली या कोडय़ाचा उलगडा होत नाही. म्हणूनच ही संकल्पना बदलावी लागणार आहे. पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का याबाबत संशोधन सुरू आहे. कोठे जीवसृष्टी असेल, तर ते आपल्यापेक्षा पुढे असतील. त्यासाठी दोन प्रकारे पुरावे मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. विज्ञान आणि गणितीय भाषेत रेडिओ सिग्नल पाठविले जात आहेत. त्यास प्रतिउत्तर  मिळाल्यास इतर ग्रहावर जीवसृष्टी असल्याचे सिद्ध होईल. तसेच दुसरा प्रयत्न म्हणजे पृथ्वीपासून ४१ कि.मी. उंचीवर व्हायरस तपासला जात आहे. तेथे परग्रहावरील व्हायरस आढळ्यास इतर जीवसृष्टीचा शोध घेता येणे शक्य होणार आहे.’

वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज

समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची किती गरज आहे याची जाणीव मला या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केल्यावर जाणवली. वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यासाठी तरुणांना काम करण्यास खूप वाव आहे, असे डॉ. जयंत नारळीकर यांनी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button