मुंबई

विविध मागण्यांसाठी शास्त्रज्ञ पुन्हा रस्त्यावर

मूलभूत संशोधनाला आणि उच्च शिक्षणाला पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, अवैज्ञानिक संकल्पनांना प्रतिष्ठा न देता वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा आदी मागण्यांसाठी येत्या १४ एप्रिल रोजी मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये ‘इंडिया मार्च फॉर सायन्स’ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ सहभागी होणार असून विज्ञानाच्या गळचेपीविरोधात ते आवाज उठवणार आहेत.

मागच्यावर्षी २२ एप्रिल रोजी वैज्ञानिक जगताच्या वतीने जगभर ‘मार्च फॉर सायन्स’चे आयोजन करण्यात आले होते. त्याच उपक्रमाच्या धर्तीवर कोलकाता येथील ब्रेकथ्रू सायन्स सोसायटीच्या पुढाकाराने देशातील १२ प्रमुख शहरांमध्ये ९ ऑगस्ट रोजी ‘इंडिया मार्च फॉर सायन्स’चे आयोजन करण्यात आले होते. यानंतरही देशातील परिस्थितीत कोणतेही बदल न झाल्याने यावर्षी १४ एप्रिल रोजी या मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील अवैज्ञानिक संकल्पनांना सध्या मिळत असलेली प्रतिष्ठा, मूलभूत संशोधनाला पुरेसा निधी उपलब्ध न होणे या निषेधात व सर्वसाधारण उत्पन्नाच्या ३ टक्के हिस्सा विज्ञानतंत्रज्ञानावरील संशोधन, १० टक्के हिस्सा शिक्षणावर खर्च व्हावा, भारतीय राज्यघटनेमधील अनुच्छेद ५१ ए मध्ये म्हटल्यानुसार, अवैज्ञानिक, छद्मवैज्ञानिक कल्पनांचा प्रसार, धार्मिक असहिष्णूतेचा प्रसार करणे थांबवून वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवी नीतीमूल्ये आणि जिज्ञासा जोपासावी, शिक्षणव्यवस्थेमध्ये केवळ वैज्ञानिक निकषांवर सिद्ध झालेल्या कल्पनाच विद्यार्थ्यांपुढे मांडल्या जाव्यात, पुराव्याने सिद्ध असलेल्या वैज्ञानिक कल्पनांवरच धोरणे आधारित असावीत अशा मागण्यांसाठी हा मार्च असणार आहे.

मुंबईतील मार्च १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता नेहरू तारांगण ते हाजी अली चौक यादरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या मार्चमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी https://www.facebook.com/IMFSmumbai/ यावर भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी www.breakthrough-india.org/MFS2018/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button