breaking-newsक्रिडा

विराट कोहलीला अटक करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल

चेन्नई : विराट कोहलीला अटक करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. चेन्नईतले वरिष्ठ अधिवक्ता एपी सूर्यप्रकाशम यांनी ही याचिका दाखल केली आहे. जुगार (गॅम्बलिंग) हा भारतीय कायद्यामध्ये गुन्हा आहे. ऑनलाईन जुगारामुळे तामीळनाडूमध्ये तरुणांचं आत्महत्या करायचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ऑनलाईन जुगारावर बंदी घालावी, तसंच ऑनलाईन जुगार चालवणाऱ्यांवर आणि याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर कायदेशीर कारवाई व्हावी, तसंच यांना अटक करण्यात यावी, असं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

याप्रकरणाची सुनावणी ४ किंवा ५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. या याचिकेमध्ये ऑनलाईन जुगाराची तुलना ब्लू व्हेल चॅलेंज गेमशी करण्यात आली आहे. ब्लू व्हेल चॅलेंज या गेममुळे अनेकांनी आपला जीव गमावला होता. हा ऑनलाईन जुगार समाजासाठी धोकादायक असल्याचंही याचिकेत सांगण्यात आलं आहे. तरुणांना या ऑनलाईन जुगाराचं व्यसन लागलं आहे, कारण या गेममध्ये लोकांना कॅश बोनस देण्यात येत आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

या गेमला प्रसिद्धी देण्यासाठी क्रिकेट आणि चित्रपटातल्या दिग्गजांचा वापर केला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, तमन्ना भाटिया यांच्यासारखे सेलिब्रिटी तरुणांचा ब्रेन वॉश करतात. तरुण टाईमपास म्हणून हा गेम खेळायला सुरूवात करतात, पण जेव्हा याचं व्यसन लागतं, तेव्हा तरुण कर्ज घेतात. मोठं नुकसान झाल्यावर त्यांना कर्जाची परतफेड करता येत नाही, मग ते आत्महत्या करतात, असं या याचिकेत मांडण्यात आलं आहे.

जुगाराचं हे व्यसन समाजासाठी हानिकारक आहे आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ चं उल्लंघन आहे, जे आयुष्य जगण्याचा हक्क काढून घेतं. त्यामुळे या गेमवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

चेन्नईमध्ये १९ वर्षांच्या एका तरुणाने आत्महत्या केली होती. या मुलाच्या सुसाईड नोटमध्ये ऑनलाईन गॅम्बलिंगचा उल्लेख आहे. प्रशासनाला याबाबत माहिती आहे, पण त्यांनी याबाबत कोणतीही पावलं उचलली नाहीत.

ऑनलाईन गॅम्बलिंग ही प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा नाही का? असा प्रश्न याचिकाकर्ते सूर्यप्रकाशम यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘ऑनलाईन गॅम्बलिंगमधून नुकसान लगेच होतं, तर सिगरेट आणि दारूमुळे १५ वर्षांनी नुकसान होतं. तरुण मुलं सेलिब्रिटींच्या जाहिरातींमधून प्रभावित होतात. कुटुंबाने मेहनतीने कमवालेले पैसे ही मुलं फुकट घालवतात, आणि मग कर्ज घेतात. मागच्या काही दिवसांमध्ये या घटनांमध्ये वाढ झाली आहे, कारण अनेक तरुण बेरोजगार बसले आहेत.’

केंद्र आणि राज्य सरकार पैशांचा व्यवहार असलेली ऑनलाईन रमी तसंच इतर ऑनलाईन कार्ड गेमवर बंदी आणण्याबाबत कायदा करू शकतं, असं काहीच दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टाच्या मदुरई खंडपीठाने सांगितलं होतं. तेलंगणा सरकारनेही अध्यादेश आणून १९७४च्या गेमिंग कायद्यामध्ये संशोधन केलं होतं. यामुळे तेलंगणा राज्यात कोणतीही व्यक्ती पैशांचा व्यवहार असलेला गेम खेळू शकत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button