breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करा – सुभाष देशमुख

  • सहकारमंत्री देशमुख यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन
  • वाल्हेकरवाडीत शहर, जिल्हा ग्रामीणच्या पदाधिका-यांचा झाला मेळावा

पिंपरी, (महाईन्यूज) – आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि पुणे जिल्हा ग्रामीणमधील १० अशा एकूण १३ विधानसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व आमदार सुरेश हाळवणकर यांनी सोमवारी (दि. २९) केले. तसेच सहकारमंत्री व पुणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी सुभाष देशमुख यांनी यंदा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

वाल्हेकरवाडी येथे पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शक्तीकेंद्र प्रमुखांचा मेळावा झाला. त्यावेळी हाळवणकर आणि देशमुख बोलत होते. यावेळी कामगार राज्यमंत्री व पिंपरी-चिंचवडचे प्रभारी बाळा भेगडे, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार बाबुराव पाचर्णे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव उमा खापरे, शहर संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, सरचिटणीस अमोल थोरात यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील २४० आणि पुणे जिल्हा ग्रामीणचे ७० शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी एक तास संघटनात्मक बैठक घेतली. त्यांनी सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी सर्व कार्यकर्ते आणि शक्तीकेंद्र प्रमुखांचे म्हणणे ऐकून घेतले. या सर्वांनी केलेल्या सूचनांचा पक्ष पातळीवर निश्चित विचार करण्याचे आश्वासन दिले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जास्तीत जास्त पक्ष सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पिंपरी-चिंचवडमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना किमान तीन लाख राख्या पाठवण्याचे आवाहनही त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १० अशा एकूण १३ विधानसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याचा चंग बांधूनच जोमाने कामाला लागण्यास त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला ‘सुवर्णकाळ’

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शक्तीकेंद्र प्रमुखांना मार्गदर्शन करताना आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आवाहन केले. विधानसभा निवडणुकीत २२० जागांवर विजय मिळवायचा आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्याच्या जिद्दीने कामाला लागावे. येणारा काळ हा भाजपचा सुवर्ण काळ असणार आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत पक्षाने आखून दिलेले कार्यक्रम कार्यकर्त्यांनी राबवावेत. जनतेत मिसळून काम केल्यास निवडणुकीत आपला विजय नक्की असल्याचा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

तिन्ही विधानसभा ताकदीने लढवू – लक्ष्मण जगताप

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रास्ताविक करताना पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघात ताकदीने निवडणूक लढवून विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्यातील विविध योजना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून आखल्या. त्याचा लाभ लाखो गरजूंना आजपर्यंत मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ प्रतिमा असलेले देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही कामाला सुरूवात केली आहे. सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या भाजपच्या पाठीशी पिंपरी-चिंचवडमधील जनता असल्याचे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button