breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

विद्यासागर यांच्या पुतळ्यावर हल्ला करणारे माथेफिरूच: शिवसेना

महाराष्ट्रात जे स्थान महात्मा फुले यांना आहे तेच स्थान पश्चिम बंगालात ईश्वरचंद्र विद्यासागर यांना असून विद्यासागर यांच्या पुतळ्यावर हल्ला करणारे माथेफिरू आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे. पुतळ्याची तोडफोड करणाऱ्यांना स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांचा अर्थ समजलेला नाही, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची कोलकात्यातील हिंसाचारावेळी मोडतोड करण्यात आली. यावरुन भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असून या घडामोडींवर शिवसेनेने शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले.  ईश्वरचंद्र हे साहित्य, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातले शिखरपुरुष होते. महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगाल प्रांतालाही क्रांतिकारक व समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे, याकडे शिवसेनेने लक्ष वेधले आहे. ईश्वरचंद्र यांनीही दुःखी, कष्टी, पीडित, उपेक्षित यांच्यासाठी आपले आयुष्य वेचले असून त्यांच्या नावाने विद्यापीठे उभी राहिली. त्याच विद्यापीठाच्या आवारातला या महापुरुषाचा पुतळा तोडण्यात आला आता. नवा पुतळा उभारला जाईल, पण विद्यासागर यांच्या पुतळ्यावर हल्ला करणारे माथेफिरू आहेत. त्यांना स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांचा अर्थ समजलेला नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

कोण होते विद्यासागर?
ईश्वरचंद्र विद्यासागर (१८२०-१८९१) यांचे मूळ नाव ईश्वरचंद्र बंदोपाध्याय. संस्कृत व्याकरण, वेदांत, तर्कशास्त्र आणि हिंदू शास्त्राचे संपूर्ण ज्ञान वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी प्राप्त केल्याने त्यांना ‘विद्यासागर’ ही पदवी मिळाली. त्यानंतरच्या दहा वर्षांत त्यांनी इंग्रजी साहित्य आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. ते भाषातज्ज्ञही होते. गेली १२५ वर्षे त्यांचीच भाषापुस्तके ही बालशिक्षणात वापरात आहेत. तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, प्रकाशक म्हणूनही त्यांची ख्याती होतीच, पण समाजसुधारक या नात्याने त्यांनी बालविवाह रोखणे आणि विधवा पुनर्विवाहाला वाव देणे, ही त्यांची ऐतिहासिक कामगिरी मानली जाते. बंगालमध्ये स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्रीशिक्षणाचा पाया त्यांनी सर्वप्रथम घातला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button