breaking-newsराष्ट्रिय

विद्यार्थ्यांनी “स्वच्छ भारत इंटर्नशीप’मध्ये सहभागी व्हावे – जावडेकर

  • मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आवाहन 

नवी दिल्ली – देशभरातल्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. यासाठी स्वच्छ भारत समर इंटर्नशीप-100 तास स्वच्छतेसाठी ही मोहीम या मंत्रालयाने सुरु केली आहे. या मोहिमेत पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयही सहभागी झाले आहे. संपूर्ण देशामध्ये ग्रामीण भागात शौचालयासंबंधी अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.

शौचालय कामासंबंधी युवकांना कौशल्य विकासाचे मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार 1 मे ते 31 जुलै 2018 या कालावधीमध्ये प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत. युवकांना स्वच्छता अभियानात कशा पद्धतीने सहभागी होता येईल, ग्रामीण भागात समाजसेवा म्हणून स्वच्छतेची कोणती कामे करता येतील याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी सुरु केलेल्या स्वच्छ भारत कार्यक्रमाने आता चळवळीचे रुप घेतले आहे. अनेक संस्था, नागरीक या अभियानात सहभागी झाले आहेत. आता विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये “स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’ करावी यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक योजना तयार केली आहे, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.

या इंटर्नशीपमध्ये विद्यार्थ्यांनी 10 ते 15 दिवस एखाद्या खेडे गावामध्ये राहून किंवा रोज भेट देऊन त्या गावाला स्वच्छ करायचे आहे. त्या गावाचा संपर्ण चेहरा-मोहरा बदलून ते सुंदर, घाण-धुळ मुक्त बनवायचे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होणे अपेक्षित आहे.

स्वच्छता इंटर्नशिप करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावे संबंधित महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये नोंदवावीत. विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे किंवा समुहानेही अशी इंटर्नशीप करता येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने या स्वच्छता इंटर्नशीपसाठी किमान 100 तास देणे अपेक्षित आहेत. विद्यार्थ्यांनी 15 मे 2018 पर्यंत आपली नावे नोंदवावीत असे आवाहन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केले आहे.

गुणांकनामध्ये लाभ 
या इंटर्नशीपचा लाभ विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांकनात होणार आहे. तसेच स्वच्छता भारत इंटर्नशीप प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वच्छता स्पर्धेसाठी वेगवेगळी पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.यामध्ये विद्यापीठ स्तरावर अनुक्रमे 30 हजार, 20 हजार, 10 हजार रुपये आणि प्रमाणपत्र. राज्य स्तरावर 50 हजार, 30 हजार, 20 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांना 2 लाख, 1 लाख, 50 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button