breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य खरेदीत टक्केवारीचे ‘धडे’ ?

महापाैर निधी वळवण्यासाठी अधिकारी-ठेकेदारांचा आटपिटा

पिंपरी – महापालिका शिक्षण मंडळातील पावसाळी साहित्य खरेदीसाठी सन 2018-19 अंदाजपत्रात शून्य तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे  15 जूनला शाळा सुरु होणार असल्याने विद्यार्थी  पावसाळी साहित्यापासून वंचित राहू नयेत, याकरिता अधिकारी व ठेकेदारांच्या सांगण्यावरुन जनतेच्या आपत्कालीन व गरजेच्या विकास कामांसाठी असलेला महापाैर निधी वळवण्यात आला आहे. दरम्यान, पावसाळी साधने खरेदी करणा-या मुंबईतील ठेकेदाराच्या भल्यासाठी सुमारे 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी शालेय साहित्य खरेदीसाठी वळवण्यात आला. परंतु, त्या विद्यार्थ्यांच्या खरेदीत अंदाजे सात ते दहा टक्के अधिकारी व पदाधिका-यांसाठी रक्कम खर्ची घालण्यात आल्याने टक्केवारीचा वाद नव्याने उफाळणार अाहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळी साहित्य दर्जेदार मिळणार का ? याबाबत शंका उपस्थित होवू लागली आहे.  

महापालिकेच्या महापौरांना एखाद्या आपत्कालीन कामासाठी अथवा जनतेच्या हितासाठी काही कामे सूचविल्यास ती करता यावीत, म्हणून महापौर विकास निधीची दरवर्षी अंदाजपत्रकात ठेवला जातो. त्यानूसार सन 2018-19 अंदाजपत्रकात महापाैर विकास निधी पालिकेतील लेखा विभागातील अधिकार्‍याने शिक्षण मंडळातील वादगस्त रेनकोट, दप्तर व पाट्या खरेदीसाठी वळविला आहे. पावसाळी साधने खरेदी करणारा हा ठेकेदार मुंबईतील असून त्यासह आपले भले व्हावे, याकरिता महापाैर निधी 5 कोटी तरतूदीपैकी सुमारे 2 कोटी 65 लाख रुपये वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे महापौर काळजे यांनी 19 मे 2018 रोजी निधी वर्ग करण्यासाठी लेखी पत्र दिले. त्या खरेदीला  21 मे 2018 रोजी पालिका प्रशासनाने मंजूरी दिली. त्यामध्ये 2 कोटी 65 लाखांपैकी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोट खरेदीला 1 कोटी 70 लाख रुपये, विद्यार्थ्यांच्या दप्तरे व पाट्या खरेदीला 70 लाख रुपये व बालवाडी दप्तरे खरेदीसाठी 35 लाख रुपये निधीची तरतूद वर्ग केलेली आहे.

दरम्यान, शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या बुट खरेदीसाठी 1 कोटी 15 लाखांची आवश्यकता असताना त्यास 28 लाख रुपयांची तरतूद शिल्लक आहे. ठेकेदाराशी योग्य तडजोड न झाल्याने बुट खरेदीसाठी 87 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलेला नाही, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button