breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

वाहन नियमबाह्य़ उभे केल्यास आजपासून महादंड

२३ वाहनतळांलगत कारवाई; पाच ते पंधरा हजार रुपये आकारणार

सार्वजनिक वाहनतळांलगत ५०० मीटरच्या आत गाडय़ा नियमबाह्य़ उभ्या केल्यास पाच हजार ते पंधरा हजारांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. पालिकेच्या या बहुचर्चित निर्णयाची रविवार, ७ जुलैपासून अंमलबजावणी केली जाईल. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगत कारवाई होणार आहे. ७ ठिकाणचे वाहनतळ हे कंत्राटदाराची नियुक्ती होईस्तोवर मोफत आहेत.

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे गाडय़ा उभ्या करण्यासाठी (पार्किंग) मुंबईत जागा मिळणे मुश्कील होऊ लागले आहे. वाहनचालक नियमांचे पालन न करता रस्त्यावर मिळेल तेथे गाडय़ा उभ्या करत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. अशा वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पालिकेने वाहनतळाच्या आसपास नियमबाह्य़ पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरवले आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी नुकतीच तशी घोषणा केली होती. या निर्णयाची आजपासून (७ जुलै) अंमलबजावणी केली जाणार आहे.

कारवाईचे नियोजन व व्यवस्थापन हे २४ प्रशासकीय विभागांत साहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर करण्यात येणार असून कारवाईचा दैनंदिन अहवाल तयार करण्यात येणार आहे. कारवाईसाठी आवश्यकतेनुसार वाहतूक पोलिसांचे साहाय्य घेण्यात येणार आहे. या कारवाईअंतर्गत नियमबाह्य़ उभ्या केलेल्या वाहनांचे टोचन (टो) करण्यात येणार आहे. टोचन केलेल्या वाहनांवर मालकी हक्काचा दावा होईस्तोवर वाहनांवर प्रतिदिन विलंब आकारदेखील लावण्यात येणार आहे. टोचन केलेली वाहने संबंधित मालकांद्वारे ३० दिवसांच्या आत सोडवून न नेल्यास ती वाहने बेवारस असल्याचे समजून त्यांची लिलावात विक्री केली जाईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे. या कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात काही रस्ते ‘नो पार्किंग झोन’ म्हणून निर्धारित करण्यात येणार असून या रस्त्यांवर गाडी उभी केल्यास महापालिकेद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळीय उपायुक्तांना व सहआयुक्तांना त्याकरिता रस्ते निर्धारित करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

कारवाई कशी?

महापालिकेद्वारे विविध १४६ ठिकाणी तब्बल ३४ हजार ८०८ वाहने ‘पार्क’ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३ ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरात कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या वाहतूक खात्याद्वारे याबाबत जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button