breaking-newsपुणेमहाराष्ट्र

वाहतुकीचा बट्ट्याबोळ!

  • व्यवस्था कोलमडली : सलग दुसऱ्या दिवशी मनस्ताप
    – कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्त्यासह पेठा जाम

पुणे – जोरदार पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे. सोमवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचे हाल झाले होते. हीच परिस्थिती सलग दुसऱ्या दिवशीही दिसून आली. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी नियोजन न केल्याने नागरिकांना तासन्‌तास मनस्ताप सहन करावा लागला.
मंगळवारी सकाळपासूनच जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा होत्या. येथून प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः दत्तवाडी, डेक्कन परिसर, सदाशिव पेठ, नारायण पेठांमधील रस्ते जाम झाले होते.
विसर्गामुळे नदीपात्रातील रस्ता आणि भिडे पूल वाहतुकीसाठी बंद होता. त्याचा ताण डेक्‍कन परिसर, फर्गसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्त्यासोबतच सदाशिव पेठ, नारायण पेठेतील रस्त्यांवर आल्याने हे रस्तेदेखील जाम झाले. अशातच कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने तेथील वाहतूक संथगतीने सुरू होती.
————————
नळस्टॉप-डेक्‍कन प्रवासाला तासभर!
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नळस्टॉपपासून डेक्कनपर्यंत येण्यासाठी तब्बल तासभर लागल्याचे काही वाहनचालकांनी सांगितले. टिळक रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांचे पार्किंग करण्यात आल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. अशातच दुपारी तीनच्या सुमारास या रस्त्यावर पीएमपी बस बंद पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. बेशिस्त वाहनचालक आणि सिग्नल तोडून वाहन चालविणाऱ्या नागरिकांमुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडली होती. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागला.
——————
सिग्नल बंद, नियमन “मॅन्युअली’
शहरातील जुना बाजार चौक, डेक्कन मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा सोमवारी बंद पडली होती. यामुळे याठिकाणी वाहतूक पोलिसांकडून “मॅन्युअली’ वाहतूक नियमन केले जात होते. मंगळवारीही गर्दीचे स्वरुप जास्त असल्याने काही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून “मॅन्युअली’ नियमन केले जात होते. शिवाजीनगर, डेक्कन, सेनापती बापट रस्ता, स्वारगेट चौक, अभिनव चौक, टिळक रस्ता, जुना बाजार रोड, अशा अनेक ठिकाणी पाणी तुंबले. यातून वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागली.
—————————-

मेट्रोच्या कामामुळे कर्वेरोड परिसरात वाहतूकोंडीचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाहनांची सर्वाधिक वर्दळ या रस्त्यावरून आहे. परिणामी, “पीक अवर्स’मध्ये गर्दी होत असल्याने या ठिकाणी जादा ट्रॅफिक वॉर्डनची आवश्‍यकता आहे.
– नीलेश ढेकळे, वाहनचालक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button