breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वारणेचे पाणी पेटले…!

कोल्हापूर –  इचलकरंजी शहराची तहान भागवण्यासाठी नगरपालिकेने आधीच्या पंचगंगा, कृष्णा या नद्यांचा प्रवाह दूषित झाल्याचे कारण देत शुद्धतेची खात्री देणाऱ्या वारणा नदीकडे मोर्चा वळवला आहे. तर, वारणाकाठी वसलेल्या शिरोळ तालुक्यातील गावांनी पाणी योजना साकारण्यास सक्त विरोध सुरू केला असून, त्यावरून हिंसक पडसाद उमटू लागले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इचलकरंजीकरांनी बाह्य सरसावून जशास तशी लढाई देण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याने पाण्याप्रमाणेच वातावरण दूषित बनले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

‘शहर ’ विरुद्ध ‘ ग्रामीण’ असा संघर्ष उफाळून आला असताना शेतकऱ्यांची बाजू घेऊन ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील मैदानात उतरल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील, योजना साकारण्यासाठी प्रयत्नशील भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर आणि जिल्हा प्रशासन यांच्यासमोरही आव्हान उभे ठाकले आहे. या साऱ्या गदारोळात गेल्या ४० वर्षांपासून वारणा नदीचा बृहद् आराखडा अद्यापही भिजत घोंगडय़ात खितपत पडला असून नदी- पाणी नियोजनाचा बट्टय़ाबोळ कसा सुरू आहे यावर झगझगीत प्रकाश पडत आहे.

शहरांचा  पिण्याचा पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे. कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा ही देशातील आत्यंतिक दूषित नद्यांपैकी एक. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेने ५३ किलोमीटर अंतरावरील मूळ खर्च ४५० कोटी रुपये असलेली काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. तर, कोल्हापूरनंतर मोठे शहर असलेल्या इचलकरंजीने वारणा नदीतून पाणी आणण्याची ७० कोटीची योजना आखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते योजनेचा ऑनलाइन वर्षांपूर्वी प्रारंभ होऊनही अद्याप कसलेही काम सुरु झाले नसल्याने शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत आणि आता संघर्ष रंगला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button