breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’च्या प्लाझ्मा संकलन पेढीवर प्रचंड ताण

महापालिका प्रशासन अन् लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री अभावी डॉक्टर हतबल

पिंपरी । प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्लाझ्मा संकलन करणाऱ्या वायसीएम हॉस्पिटलमधील प्लाझ्मा संकलन पेढीवर प्रचंड तणाव आहे. विनामूल्य प्लाझ्मा उपलब्ध करुन दिल्यामुळे पुणे जिल्ह्यासह सांगली, सातारापासून रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी होत आहे.
विशेष म्हणजे, अपुऱ्या मनुष्यबळावर चालणारी या प्लाझ्मा संकलन पेढीतील ९ कर्मचारी कोरोबाधित झाले आहेत. तसेच, प्रतिदिन २४ बॅग प्लाझ्मा संकलनाची क्षमता आहे. मात्र, दररोज संकलन होणाऱ्या प्लाझ्मापेक्षा चारपट जास्त प्लाझ्माची मागणी होत असल्याने संकलन पेढीवर वादाचे प्रसंग निर्माण होवू लागले आहेत.
वास्तविक, महाराष्ट्रात कोणत्याही रक्तपेढीवर प्लाझ्मा मोफत उपलब्ध करुन दिला जात नाही. पण, वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना अगदी मोफत प्लाझ्मा उपलब्ध होतो. तसेच, वायसीएम व्यतिरिक्त अन्य रुग्णालयातील रुग्णांसाठी हस्तांतरण शुल्क अवघे ४०० रुपये घेवून प्लाझ्मा दिला जातो. याउलट, राज्यातील खासगी तसेच काही शासकीय रक्तपेढ्यांमध्ये सुमारे १० ते १२ हजार रुपयांपर्यंत २०० मीली प्लाझ्माच्या बॅगचे शुल्क आकारले जाते.
परिणामी, वायसीएममध्ये मोफत किंवा नाममात्र शुल्कात (४०० रुपये) प्लाझ्मा मिळवण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी होत आहे. परंतु, प्लाझ्मा संकलन पेढीची दैनंदिन क्षमता केवळ २४ बॅग इतकी आहे. अवघे १२ दाते प्लाझ्मादान करु शकतात. पण, दैनंदिन किमान १०० बॅगची मागणी आहे. संकलन पेढीवर आलेल्या प्रत्येक नागरिकाला प्लाझ्मा मिळावा, अशी अपेक्षा असते. मग, प्लाझ्मा उपलब्ध न झाल्यास नागरिक आणि संबंधित कर्मचारी यांच्या वाद निर्माण होतात.
सध्यस्थितीला वायसीएम प्लाझ्मा संकलन पेढीमध्ये १८ टेक्निशियन, ४ बीटीओ आणि २ डॉक्टरांची आवश्यकता आहे. पण, याक्षणी आपल्याकडे ११ टेक्निशियन, २ डॉक्टर आणि ४ वॉर्डबॉय आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी ९ जण कोरोनाबाधित झाले आहेत. मनुष्यबळासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. पत्रव्यवहार केला आहे. पण, कार्यवाही केली जात नाही, असे चित्र आहे.
वायसीएमचा प्लाझ्मा केवळ ‘पीसीएमसी’ हद्दीत द्यावा…
याबाबत रक्त संकलन अधिकारी डॉ. शंकर मोसलगी म्हणाले की, सध्यस्थितीला आम्ही वायसीएम रुग्णालयातील रुग्णांची प्लाझ्मा मागणी उपलब्ध करुन देवू शकतो. तेवढी क्षमता पेढीची आहे. पण, अतिरिक्त मागणीची पूर्तता होवू शकत नाही. पुण्यात २० तर पिंपरी-चिंचवडमध्ये अवघ्या ४ रक्तपेढ्या आहेत. ज्याठिकाणी प्लाझ्मा संकलन केले जाते. भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी ‘प्लाझ्मा दान करा..एक जीव वाचवा’ ही मोहीम हाती घेतली. शहर आणि परिसरात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे प्लाझ्मा दान करणाऱ्या दानशूर व्यक्तींची संख्या आपल्याकडे मोठी आहे. पण, मनुष्यबळ आणि यंत्रणा अपूर्ण आहे, ही वस्तुस्थिती आहे. राज्यात कुठेही मोफत प्लाझ्मा दिला जात नाही. त्यामुळे पीसीएमसी हद्दीत प्लाझ्मा मोफत द्यावा. पण, हद्दीबाहेरील मागणी नियंत्रित करण्यासाठी शुल्क आकारावे, याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे.
लोकप्रतिनिधींचा ‘हा’ निर्णय चुकला?
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेत नगरसदस्यांनी सर्वानुमते वायसीएम रुग्णालयातील प्लाझ्मा संकलन पेढीतून मोफत प्लाझ्मा देण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक, वैद्यकीय विभागाने सशुल्क प्लाझ्मा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तसेच अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी आदेशही काढले होते. मात्र, लोकप्रतिनिधींनी पैसे वाचवण्यापेक्षा लोकांचे प्राण वाचले पाहिजेत…असा हट्ट धरला. पण, त्याची अंमलबजावणी करताना त्या प्रमाणात प्लाझ्मा दाते उपलब्ध होतील का? आपल्याकडे मनुष्यबळ पुरेसे आहे का? याचा विचार केला नाही. त्यामुळे निर्णय प्रथमदर्शनी योग्य असला तरी आपल्या यंत्रणेकडील क्षमतांचा विचार केलेला दिसत नाही.

याबाबत भाजपाचे प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी म्हणाले की, वायसीएम प्लाझ्मा संकलन पेढीच्या कामकाजाची माहिती घेतली आहे. सर्वाधिक प्लाझ्मा संकलन या पेढीवर होत आहे. पण, पिंपरी-चिंचवड व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून प्लाझ्मा मागणी होत असल्यामुळे ताण निर्माण झाला आहे. त्यानुसार महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडणार आहे. तसेच, संबंधित विभागाचे अधिकारी आणि आमदार लांडगे यांची बैठक आयोजित करुन प्लाझ्मा संकलन पेढीतील नवीन मशीन आणि मनुष्यबळ याबाबत तोडगा काढण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button