breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाढीव वीज दराच्या निषेधार्थ भाजपाकडून महावितरणला ठोकले टाळे

पिंपरी ! प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने महावितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन घेण्यात आले. कोरोना काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलेले वाढीव वीज बिल भरण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाने तगादा लावल्यामुळे शासनाच्या व वीज वितरण विभाग यांच्या विरुद्ध हे आंदोलन करण्यात आले. पिंपरी येथील महाराष्ट्र शासनाच्या महावितरण कार्यालयासमोर घेण्यात आले. भाजपाचे हे आंदोलन भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे तसेच भाजपा माजी जिल्हाध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले.

आंदोलना वेळी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार अमर साबळे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, जिल्हा सरचिटणीस राजा दुर्गे, जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे, माजी महापौर राहुल जाधव, नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेवक शितल शिंदे, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे, सुजाता पालांडे, त्याचबरोबर इतर पक्षाचे सर्व नगरसेवक जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी प्रदेशाचे सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशस्वीरित्या पार पाडले.

भाजपच्या वतीने या पुर्वीही निवेदनाद्वारे इशारा दिला होता. अनेक मागण्यांचा समावेश भाजपने नमूद केला होता. या मध्ये शासनाने लोकांना दिलेली जुलमी वाढीव वीज बिले ताबडतोब रद्द करावीत या मागणीचे पत्र संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले. कोरोना काळात जनतेला वाढीव वीज बिले पाठवण्यात आली व हि वाढीव बिले माफ करण्याचे ढोंगी आश्वासन देणारे हे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे.थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र,आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला होता.
फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना व सर्वसामान्य जनतेस वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. भाजपचे राज्य असताना कृषी क्षेत्रासाठी साडे सात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या. पण वीज कंपन्यांही फायद्यात राहील्या होत्या. जर आम्हाला (भाजपा सरकारला) हे शक्य होते तर आताच्या सरकारला का नाही असा, सवाल भाजपने उपस्थित केला.
कोरोना काळात आवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच 100 युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून आधिच आर्थिक संकटात असलेल्या सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नये. अन्यथा भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा, देण्यात आला होता. त्यानुसार महावितरणला टाळे ठोको आंदोलन घेण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button