वाडिया रुग्णालयातील सेवा पूर्वपथावर
मुंबई | महाईन्यूज
वाडिया रुग्णालयाच्या थकीत अनुदानाच्या प्रश्नावर मंगळवारी तोडगा निघाल्यानंतर रुग्णालयातील सर्व विभाग बुधवारी पूर्ववत झालेले आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या वादावर पडदा पडला असून रुग्णालय सुरळीतपणे सुरू झाल्याने रुग्णांनाही दिलासा मिळालेला आहे.
वाडिया रुग्णालयाला राज्य सरकार आणि पालिकेकडून प्राप्त होणारे अनुदान थकीत असल्याने रुग्णालय प्रशासनाने गेल्या आठवडय़ापासून नवे रुग्ण दाखल करून घेणे, आपत्कालीन रुग्णांना उपचार देणे इत्यादी सेवा खंडित केलेल्या होत्या. तसेच ३०० हून अधिक रुग्णांना घरी सोडले होते. रुग्णालय बंद करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे लक्षात घेऊन मंगळवारी राज्य सरकार, पालिका आणि रुग्णालय प्रशासनाची बैठक झालेली आहे. या बैठकीत तोडगा काढल्यानंतर रुग्णालयाने पूर्ण सेवा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिलेले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या अर्थ विभागाने २४ कोटी रुपये रुग्णालय प्रशासनाला देण्याचे आदेश दिलेले आहेत.