breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडची विकास कामे थांबविली; भाजपचा खरा चेहरा उघड – शिवसेना गटनेते राहूल कलाटे

विकास कामांना विरोध का करताय, हे आमदारांनी लोकासमोर जाहीर करावे, कलाटेचे खुलं आव्हान

पिंपरी |महाईन्यूज|

वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरातील विकास कामांना खो घालण्यात येत आहे. त्या भागातील नागरिकांकडून कोट्यावधीचा कर घ्यायचा, पण तेथील लोकांना पायाभूत मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्यायच्या नाहीत. महापालिका अंदाजपत्रकात तरतूद असूनही विकास कामांना मंजूरी द्यायची नाही. अशा प्रकारे राजकीय आकसापोटी विकास कामे थांबवण्यात येत आहेत. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला असून आमच्या कामांना विरोध का करताय हे आमदार लक्ष्मण जगतापांनी लोकांसमोर जाहीर खुलासा करावा, असे आव्हान शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेची आज (गुरुवारी) स्थायी समिती सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे होते. स्थायीच्या विषय पत्रिकेवरील एक आणि दोन ही प्रभाग क्रमांक 25 मधील जीवननगर येथून मुंबई-पुणे हायवेकडे जाणा-या 24 मीटर डीपी रस्ता, प्रभागातील आवश्यकतेनूसार सिमेंट काॅंक्रीट रस्त्यांची कामे करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आली. यावेळी मतदान घेण्यात आले. त्यात प्रस्तावाच्या विरोधात 10 आणि बाजूने 5 मते पडली. त्यावरुन स्थायीच्या भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी सदस्यांमध्ये तुतु-मैमै झाले. त्यामुळे प्रत्येक विषयावर मतदान घेण्याची मागणी राहूल कलाटे यांनी केल्याने सभापती लोढेंना सभा तहकूब करावी लागली.

कलाटे म्हणाले की, महापालिकेला माझ्या प्रभागातून कोट्यावधी रुपयाचा कर मिळतो. त्या बदल्यात तेथील नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे ही माझी जबाबदारी आहे. परंतू, भाजप आमदारांच्या हट्टापाई स्थायी समितीने प्रभाग क्रमांक 25 मधील विकास कामांना अडथळा घालण्याचे काम त्याचे अनुयायी करीत आहेत. त्यामुळेच प्रभागातील रस्त्यांच्या कामाचे विषय आज स्थायी सभापतींनी फेटाळले आहेत.

भाजप आमदार हे सर्व राजकीय आकसापोटी विकास कामांना विरोध करीत आहेत. ही कामे माझी वैयक्तिक नाहीत. प्रभागातील जनतेला सुविधा देण्यास अडथळा आणणे हे योग्य नाही. खरं तर पाण्यात देखील आमदारांना माझी प्रतिमा दिसू लागलीय. पंतप्रधान मोदीची कृपा आणि भाजपच्या तिकीटामुळे जगताप हे दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अन्यथा ते यंदा आमदार झालेच नसते. लोकांनी त्यांना त्याची जागा दाखवून दिलीय. असाही आरोप कलाटे यांनी केला आहे.

तसेच वाकड, पुनावळे, ताथवडे परिसरातील विकास कामांना भाजप आमदारांचा का विरोध आहे, हे त्यांनी लोकांसमोर जाहीर खुलासा करावा, त्यावेळी आम्ही जनतेची भूमिका देखील मांडू, आम्ही महापालिका किती कर देतो, त्या बदल्यात आम्हाला सोयी-सुविधा का मिळत नाहीत, याचा फैसलाच जनतेसमोर त्यांनी करावा, असंही आव्हान कलाटे यांनी केले आहे.

आमदारांचे भाचे ‘ब्लकलिस्ट’ होवू शकतात?

भोसरीच्या इंद्रायणीनगर येथील रस्ते सिमेंट काॅंक्रीटच्या कामात आमदारांच्या दोन भाच्यांनी चुकीचे काम केले आहे. त्या कामांची माहिती मी मागविली असून गेल्या सहा महिन्यापासून अद्याप दिलेली नाही. चुकीचे कामे केल्याने दोन भाचे ‘ब्लकलिस्ट’ होवू शकतात. तसेच अधिकारी देखील अडकू शकतात. त्यावर आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी माैन धारण केले आहे, असेही कलाटे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button