breaking-newsमहाराष्ट्र

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेची ताकद दिसेल – शरद पवार

मुंबई – कोणताही आमदार अथवा व्यक्ती पक्ष सोडून गेल्याने तो पक्ष संपत नसतो, मनसेची ताकद राज्यात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ही ताकद दिसू शकते असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलं आहे. मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी पक्षाला रामराम करत शिवसेना पक्षात काही दिवसांपूर्वी प्रवेश केला. यावर पत्रकारांनी मनसे राजकीय पक्ष म्हणून संपलाय का ?असा प्रश्न शरद पवारांना विचारला त्यावर पवारांनी हे भाष्य केलं.

यशवतंराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. मनसेबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडे तरूणवर्ग आकर्षित होतो, मनसेकडे एकही आमदार नसला तरी भविष्यात मनसेची ताकद पुन्हा दिसेल आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचे आकडे वाढलेले पाहायला मिळतील असं त्यांनी सांगितले.

मात्र मनसेला आघाडीत घेणार का या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवारांनी बगल दिली. वंचित आघाडीबाबत बोलताना पवारांनी सांगितले की, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राष्ट्रवादीने कधीही चर्चा केली नाही. प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीत यावं यासाठी काँग्रेसचे नेते त्यांच्या संपर्कात होते, मात्र आता प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झालं आहे मात्र काँग्रेससोबत अजून शेट्टी यांची चर्चा सुरु आहे अशी माहिती पवारांनी दिली.

दरम्यान राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत येण्यासाठी प्रस्ताव दिला असून त्यावर निर्णय घेण्यासाठी अल्टीमेटम दिलेला आहे. त्यामुळे आज काँग्रेस-राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी किती जागा सोडणार याचा निर्णय घेते का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button