breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

लॉकडाऊनमुळे महागाईचा फटका चहाप्रेमींनाही; कटिंग चहाचा दर वाढणार

कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका आतापर्यंत अनेक गोष्टींना बसला आहे. भाज्या,फळे असो किंवा पेट्रोल-डिझेल सर्वच गोष्टींच्या किमती वाढलेल्या पहायला मिळाल्या. त्यातच आता हाच महागाईचा फटका चहाप्रेमींना बसणार आहे. सर्वांना परवडणारा कटिंग चहाचा दर आता १० रुपये होणार आहे. कोरोनामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कार्यपद्धतीत करण्यात आलेल्या विविध बदलांमुळे आता कटिंग चहाचा दर सरसकट १० रुपये करण्याचा निर्णय ‘टी अँड कॉफी’ असोशिएशनतर्फे घेण्यात आला आहे. यापूर्वी कटिंग चहाचा दर ६ किंवा ७ रुपये इतका होता. त्यामुळे यापुढे सुरक्षित चहाचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकरांना अधिकचा खिसा खाली करावा लागणार आहे.

मुंबईत जवळपास ५ हजार नोंदणीकृत चहाविक्रेते आहेत. यापैकी बहुतांश विक्रेते रस्त्यांलगत आपला व्यवसाय थाटतात. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात यापैकी ७० टक्के चहाविक्रेत्यांनी पुन्हा एकदा व्यवसायाचा श्रीगणेशा केल्याची माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली. सध्या कोरोनामुळे आर्थिक अडचणींशी सामना करणाऱ्या चहाविक्रेत्यांना संसर्गाच्या भीतीमुळे ग्राहकांच्या प्रतिसादाबाबत साशंकता सतावते आहे. यावर तोडगा म्हणून असोसिएशनने यापूर्वीच कोविड विशेष नियमावली जाहीर केली आहे. याबाबत ‘मटा’ने २ जून रोजी ‘वाफाळत्या चहासाठी ‘कोविड’ सुरक्षित नियमांची किटली’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. यानुसार, प्रत्येक नोंदणीकृत चहावाल्यावर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. मात्र विक्रेत्यांच्या सद्यपरिस्थितीतील आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेत पहिल्या टप्प्यात मास्क, हातमोजे तसेच चहासाठी प्लास्टिक ग्लासना प्राधान्य देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात ही सेवा अधिकाधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील, असे असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांनी स्पष्ट केले.

असोसिएशनने ठरवून दिलेले निकष पाळून ग्राहकांना सेवा देताना विक्रेत्यांवर खर्चाचा भार वाढणार आहे. प्लास्टिक कप, सॅनिटायझर, व्यवसायाच्या जागेवर निर्जंतुकीकरण यासाठी विक्रेत्यांना गाठीशी असलेले पैसे खर्च करायचे आहेत. तसेच चहापावडरचे दर देखील वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे साहजिकच दर वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे चहाविक्रेत्यांचे म्हणणे आहे.

एका चहासाठी येणारा खर्च

दूध : दीड रुपया

साखर : ८०-९० पैसे

चहा पावडर : ५० पैसे

गॅस : ५० पैसे

दुकानभाडे, कामगाराचा पगार : २ रुपये

एकूण खर्च : पाच ते साडेपाच रुपये (यापूर्वीचा विक्रीदर : ७ रुपये)

वाढीव खर्च

मास्क, निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर : दोन रुपये

लॉकडाउनदरम्यान आर्थिक नुकसान : ५० पैसे

सध्याचा एकूण खर्च : साधारण ८ रुपये (नवा विक्रीदर : १० रुपये)

तर अशा पद्धतिने आता सहज परवडणाऱ्या कटींग चहासाठीही आता ज्यादा पैसे मोजावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button