breaking-newsपुणे

रेल्वे अपघातात महिन्याला 45 जणांचा बळी

पुणे- लोहमार्ग ओलांडताना पादचारी पुलाचा वापर न करणे तसेच जीव धोक्‍यात घालून लोहमार्ग ओलांडण्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षभराच्या आकडेवारीवरुन रेल्वे अपघातात महिन्याला जवळपास 45 लोकांचा बळी गेल्याचे वास्तव समोर आले आहे.

रेल्वे फलाट तसेच स्थानकातून लवकर पोहोचण्यासाठी लोहमार्ग ओलांडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. लोहमार्ग ओलांडणे हा गुन्हा आहे, मात्र अनेक प्रवासी जीव धोक्‍यात घालून लोहमार्ग ओलांडतात. बऱ्याचदा गडबडीत समोरून येणारी गाडी न दिसल्यामुळे अनेक जण जीव गमावतात. प्रेमीयुगुल रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करतात. रेल्वे स्थानकानजीक अशा प्रकारच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

लवकर पोहचण्यासाठी शॉर्टकट घेत धोकादायकपणे लोहमार्ग ओलांडणाऱ्यांचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याचे धक्कादायक चित्र सध्या दिसत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने सर्वच स्थानकांवर पादचारी पूल उभारल्याचा दावा केला आहे. मात्र जिने चढत पादचारी पूल ओलांडण्यापेक्षा जीव धोक्‍यात घालून लोहमार्ग ओलांडण्यातच प्रवासी धन्यता मानत असून रेल्वेने धडक दिल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. शिवाजीनगर, पिंपरी, चिंचवड, खडकी, आकुर्डी, देहूरोड येथे लोहमार्ग ओलांडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
———-
हेडफोनमुळे जीव गमावतात
अनधिकृतपणे लोहमार्गावरून चालताना किंवा लोहमार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघातात प्रामुख्याने मोबाइलचा हेडफोन घातक ठरत आहे. मोबाइलच्या हेडफोनद्वारे गाणी ऐकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हेडफोन लावून लोहमार्ग ओलांडणे किंवा लोहमार्गावरून जाणे अत्यंत घातक असतानाही काही जणांकडून असे प्रकार केले जातात. हेडफोनमुळे लोहमार्गावरून येणाऱ्या गाडीचा हॉर्नही ऐकू येत नाही. त्यामुळेही अपघात होण्याची संख्याही वाढत आहे.
——————-
गेल्या पाच वर्षातील आकडेवारी
2013 515
2014 461
2015 462
2016 405
2017 540
———-

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button