breaking-newsमहाराष्ट्र

रुपयाच्या मूल्यात मोठी घट…

आयातीचा खर्च वाढून महागाई भडकण्याची शक्‍यता वाढली 
नवी दिल्ली – ओपीईसी या तेल उत्पादक या संघटनेने तेलाचे उत्पादन मर्यादित पातळीवर ठेवण्याचे ठरविले असल्यामुळे आणि अमेरिका आणि इराणदरम्यानचे संबंध अधिक ताणले जाण्याची शक्‍यता असल्यामुळे क्रूडचे दर वाढत आहेत. त्याचबरोबर अमेरिका व्याजदरात वाढ करीत असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव चालूच आहे. रुपया आणखी घसरल्यास भारताला सर्व आयात महागात पडणार आहे. त्यातल्या त्यात तेलाची आयात महाग झाल्यास त्यामुळे भारताला महागाईला सामोरे जावे लागणार आहे.

भारत आपल्या गरजेच्या 80 टक्‍के इतके क्रूड आयात करीत आहे. जर क्रूड महाग झाले तर देशातील इंधनाचे दर आणखी वाढू शकतात. तसे झाल्यास भारतातील वाहतुकीचा खर्च वाढून महागाई वाढू शकते. सरकारने तेलाचे दर बाजारपेठेप्रमाणे देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे महाग क्रूडचा बोजा ग्राहकांवर थेट पडणार आहे. अगोदर सरकार यासाठी अनुदान देऊन तेलाचे दर स्थिर ठेवत होते. मात्र, आता तसे करण्यास सरकारने पुन्हा नकार दिलेला आहे.
आयातीचा खर्च वाढून निर्यात फारशी न वाढल्यास सरकारची चालू खात्यावरील तूट वाढणार आहे. तसे झाल्यास त्याचा थेट परिणाम रुपयाच्या मूल्यावर होणार आहे. आताही तेच होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रुपयाचे मूल्य कमी होत आहे. आज रुपयाचे मूल्य प्रति डॉलरला 67 रुपयांवर गेले आहे. ते आणखी कमी होण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. या घडामोडीचा परिणाम परकीय गुंतवणुकीवर होत असतो. गेल्या तीन महिन्यांपासून भारतातील परकीय गुंतवणूक विशेषत: शेअरबाजारातील परकीय गुंतवणूक कमी होत आहे.

क्रूडशिवाय भारताला बऱ्याच बाबी आयात कराव्या लागतात. त्यात स्मार्ट फोन आणि मोटारीच्या सुट्या भागाचा समावेश आहे. रुपया घसरल्यानंतर या बाबीची आयात महाग होऊन या वस्तूचे दर वाढणार आहेत. असे असले तरी रुपया कमकुवत झाल्यानंतर निर्यात करणाऱ्यांना मात्र फायदा होत असतो. त्यात औषधी कंपन्या आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. रुपया 65 ते 66 रुपये प्रति डॉलर या पातळीवर योग्य आहे, असे अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी परवा सांगितले होते. मात्र, आता रुपयाचे मूल्य त्यापेक्षाही कमी झाले असल्यामुळे आयात करणाऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

रिझर्व्ह बॅंकेने घसरत असलेला रुपया रोखण्यासाठी गेल्या पंधरवड्यात चलनबाजारात फारसा हस्तक्षेप केलेला नाही. मात्र, रुपया आणखी घसरल्यास बॅंकेला हस्तक्षेप करावा लागेल. सोमवारी रुपयाचा दर आणखी 26 पैशांनी घसरला. सोमवारी रुपयाचे मूल्य 67.13 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले होते. आयातदार जास्त डॉलरची खरेदी करीत आहेत. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात घसरत आहे. चलन बाजारातील विश्‍लेषकांनी रुपया आणखी घसरेल असे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button