breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

रुग्णांकडून जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांना अजित पवारांचा कडक शब्दात इशारा

उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत. काल म्हणजे 25 सप्टेंबरला घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी रुग्णांकडून जादा दर आकारणी करणाऱ्या रुग्णालयांना कडक इशाराच दिला आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे कुठल्याही रुग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिला. ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ मोहिमे अंतर्गत करोनाचे निदान होवून वेळेत उपचार करणे सुलभ होणार असल्याने ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले.

विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरांसह पुणे जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी अजित पवार म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. घरोघरी जावून या मोहिमे अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी होणार आहे. या मोहिमेमुळे करोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे. यातून रुग्णाला वेळेपूर्वीच उपचार मिळतील व रुग्ण लवकर बरा होईल. त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले.

कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी इतर आवश्यक उपचाराबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, करोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेता उपचारासाठीच्या सुविधाही सातत्याने वाढविण्यात येत आहेत. करोनाच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. करोना साथीला कुणीही सहजपणे घेऊ नये. या साथीवर मात करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेत शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button