breaking-newsपिंपरी / चिंचवड

रिक्षाचालकांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलन कायम

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

रिक्षा चालक-मालकांच्या विविध मागण्या मान्य न केल्यामुळे सरकारच्या विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करून सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.

रिक्षा चालकांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिना दहा हजार मिळावे, शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्ज माफ करावे, त्यांची आरसी बुक कोरे करावे, मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, ओला उबेर वर निर्बंध आणावेत, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, फायनान्स कंपनी आणि बँकेच्या वतीने हप्ते वसुलीसाठी रिक्षा चालकांना त्रास दिला जात आहे, याबाबत सक्त वसुली आणि गुंडागर्दी दादागिरी करू नये, असे आदेश सरकारने संबंधित सर्व फायनान्स आणि बँकांना द्यावेत, रिक्षा चालक मालकांसाठी घरकुल योजना राबवावी, रिक्षा चालक मालकांसाठी covid-19 च्या काळात 50 लाखाचा विमा द्यावा, अशा मागण्या रिक्षा चालक-मालकांच्या आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करून देखील सरकारने याची दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने पिंपरीत आंदोलन करण्यात आले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे, कुणाल वावळकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी बाळासाहेब सोनवणे, इजाज शेख, बाळासाहेब ढवळे, वकील शेख, दत्तू सरकते आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले, सरकारने एसटी बसला तसेच मुंबईमध्ये बेस्ट, पुण्यात पीएमपीएमएल वाहतुकीस परवानगी दिली. परंतु, रिक्षा व्यवसायात मात्र अनेक बंदणे घालण्यात आली. 70 % रिक्षा बंद आहेत, गेली सहा महिन्यापासून बंद असलेल्या रिक्षा सेवा तात्काळ सुरू करावी. रिक्षाचालकांच्या इतरही मागण्या सोडवाव्यात. अन्यथा बोंबाबोंब आंदोलन सुरूच राहणार आहे, असे बाबा कांबळे म्हणाले.         

बाळासाहेब भागवत म्हणाले, रिक्षाचालक हातावर पोट असणारा घटक असून त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. यासाठी आम्ही नुकतीच रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला होता. रिक्षावाल्यासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. सरकारने त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत असे ते म्हणाले. सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजय अवतारे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 120 रिक्षा स्थानकाच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button