breaking-newsपुणेमहाराष्ट्र

रिक्षाचालकांची मुजोरी कायम

 

रिक्षांच्या संख्येत वाढ होऊनही भाडय़ास नकार, मनमानी वसुली

रिक्षाचे परवाने खुले केल्यामुळे रिक्षांची संख्या वाढून नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा-सुविधा मिळण्याची अपेक्षा असताना शहरात नेमके उलटेच घडते आहे. भाडे नाकारणे आणि मनमानी पद्धतीने भाडय़ाची मागणी करण्याचे प्रकार शहरात पुन्हा वाढले आहेत. त्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने याबाबत कारवाईचा बडगा उगारून बिघडलेली रिक्षा सेवा पुन्हा मार्गावर आणावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

राज्य शासनाने रिक्षांचे परवाने खुले करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानंतर दोन वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नव्या रिक्षा शहरात दाखल झाल्या. नव्या रिक्षा येण्यापूर्वीही शहरात रिक्षांबाबत अनेक तक्रारी करण्यात येत होत्या. भाडे नाकारणे आणि मीटरनुसार रिक्षा न चालविता काही भागांमध्ये मनमानी पद्धतीने भाडे आकारणीच्या तक्रारी येत होत्या. मात्र, शहरात बहुतांश भागांमध्ये रिक्षा मीटरनुसार चालत होत्या. रिक्षांची संख्या वाढल्यानंतर स्पर्धा निर्माण होऊन नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा शासनाकडूनही व्यक्त करण्यात येत होती. परंतु, ही अपेक्षा फोल ठरल्याची सद्य:स्थिती आहे.

रिक्षांची संख्या जसजशी वाढते आहे, तसतशी रिक्षांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. शहराच्या अंतर्गत भागामधून बहुतांश ठिकाणी भाडे नेण्यास अनेक रिक्षा चालकांकडून नकार दिला जातो. लांबचेच नव्हे, तर अगदी जवळचे भाडे नाकारण्याचे प्रकारही होत आहेत. भाडे न्यायचे असल्यास अवाच्या सवा भाडे सांगितले जाते. त्यामुळे रिक्षा चालकाकडून सहजपणे भाडे घेणे आणि मीटरनुसार आकारणी करणे हे हळूहळू दिव्यच होत असल्याची भावना एका प्रवाशाने व्यक्त केली. शहरातील एसटी आणि रेल्वे स्थानकांच्या आवारातून नव्वद टक्क्य़ांहून अधिक रिक्षाचालक मीटरनुसार भाडे घेत नसल्याचे वास्तव आहे. बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशाची यथेच्छ लूट केली जाते. बालगंधर्व रंगमंदिरापासून एक किलोमीटरपेक्षाही जवळ असलेल्या मनपा बस स्थानकापर्यंत जाण्यासाठी पन्नास रुपये भाडय़ाची मागणी केल्याचा अनुभव एका प्रवाशाने कथन केला. त्यामुळे रिक्षा चालकांची ही मुजोरी मोडून काढण्यासाठी यंत्रणांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button