राहुल गांधींसोबत लग्न नाही; ते तर माझे भाऊ: आमदार आदिती सिंह
लखनऊ: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत लग्न ठरल्याच्या अफवांचं रायबरेलीच्या काँग्रेस आमदार आदिती सिंह यांनी खंडन केलं आहे. निराधार अफवा पसरवल्यानं मी दुःखी झाले आहे. राहुल माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांना मी राखी बांधते, असं आदिती सिंह म्हणाल्या.
आदिती सिंह यांचं राहुल गांधींसोबत लग्न ठरल्याची अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. या अफवेमुळं आदिती सिंह संतापल्या. त्यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली. राहुल माझ्या मोठ्या भावासारखे असून, त्यांना मी राखी बांधते. राहुल आणि माझं लग्न ठरल्याची अफवा पसरवणारेच चुकीचे आहेत. त्यांची आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा त्या लोकांचा डाव आहे, असंही त्या म्हणाल्या. कर्नाटक निवडणुकांवरून राहुल यांचं लक्ष वळवण्यासाठीच आमचे लग्न ठरल्याच्या अफवा पसरवण्यात येत आहेत. अफवा पसरवण्यामागचा हेतू आणि ते कोण असू शकतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे, असंही त्या म्हणाल्या.