breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

राम नाम सत्य है!

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेत राम नाम सत्य है! असे म्हटले जाते. मृत व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती लाभावी हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र सध्या भाजपावर ही वेळ पक्ष सत्तेत असताना आली आहे. तीदेखील रामामुळे. भाजपाचा हा राम कोणत्याही मंदिरातला नाही. हे नाव आहे आमदार राम कदम यांचे. दहीहंडी म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात हा माणूस जे काही बरळला त्याने भाजपाची लाज गेलीच. पण त्याहीपेक्षा जास्त लाज गेली ती याबद्दल काहीही वक्तव्य न करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांची. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीबाबत मौन बाळगता तेव्हा त्या गोष्टीला तुमचा मूक पाठिंबा आहे असाच त्याचा अर्थ होतो.

भाजपाचे हे राम कदम काय म्हटले? ”मुलीला प्रपोज केलेत ती नाही म्हटली तर तुमच्या आई वडिलांना आणा आणि ते म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन. ”  सत्ताधारी पक्षातला एक आमदार असे बोलतो आणि त्यानंतर भाजपातून काहीही प्रतिक्रिया येत नाही याचा अर्थ काय समजायचा? हे कशाचे द्योतक आहे? मुली आणि महिलांचा अपमान करणारे हे राम कदम स्वतःला दयावान म्हणवून घेतात. मुख्यमंत्र्यांच्या हे अत्यंत जवळचे आहेत. त्याचमुळे त्यांना पाठिशी घातले जाते आहे का? असा प्रश्न तमाम महाराष्ट्राला पडला आहे.

या दोघांमध्ये संवाद झाला असेल तर तो तर तो कसा असेल? याची ही फक्त कल्पना!

मुख्यमंत्री– हॅलो राम कदम अरे तू बोलून बसलास? मुली पळवण्याचं वक्तव्य? अरे तुला कळत नाही का? आता मला सगळी माहिती घ्यावी लागेल, अभ्यास करावा लागेल आणि मग तुझ्याविरोधात चौकशी समिती नेमावी लागेल.
राम कदम– अहो नाही हो फडणवीसजी मी तर असे बोललोच नाही.. त्या राष्ट्रवादीच्या आव्हाडांनी घोळ घातला. ते दहीहंडी उत्सव साजरा करत नाहीत ना.. मग त्यांना मी साजरा करत असलेला दहीहंडी उत्सव बघवत नाही. तुम्हीपण आला होतात ना त्या कार्यक्रमाला आपल्याला विकासाची दहीहंडी फोडायची आहे म्हणाला होतात ना.. मग मी तरूणांचा विकास झाला पाहिजे म्हणूनच असे बोललो.
मुख्यमंत्री– अरे पण बोलताना काही जीभ सांभाळाल की नाही?
राम कदम– अहो मला जीभेचे हाड आहेच कुठे? उचलली जीभ की लावली टाळ्याला तुम्हाला तर ठाऊकच आहे. इतिहास आपला..
मुख्यमंत्री– अहो तुम्ही आता बोलून बसलात आणि आम्हाला गप्प केलंत… आम्हाला राम म्हणायचीही सोय नाही ठेवलीत. गांधींजींसारखं आम्हालाही आता हे राम म्हणावं लागतं की काय? असं वाटतंय. आता पक्षाध्यक्षांकडे तक्रार करावी लागेल. शाह साहेब जे सांगतील ती कारवाई करावी लागेल
राम कदम – अहो मी गंमतीत म्हटले होते हो मी कशाला पळवून आणू कोणाला?
मुख्यमंत्री – अहो कुणाला पळवून आणणार नसलात तरीही तुम्ही आमच्या तोंडचं पाणी पळवलंत
राम कदम– हॅ हॅ काय साहेब विनोद करताय का?
मुख्यमंत्री– विनोदही आमच्या तावडीत नाही हो आता.. विनोदाचं कसलं घेऊन बसलात. जे बोलून बसलात त्याने महाराष्ट्र धर्म बुडालाय असे आमचा मित्रपक्ष म्हणतोय अग्रलेखात त्यांनी चक्क कमळ उखडून टाकण्याची भाषा केलीये त्यांनी.
राम कदम– अहो मित्र पक्ष म्हणजे ते धनुष्य-बाण वालेच ना.. त्यांच्या फक्त तोंडात दम आहे. बडबडूदेत त्यांना…बाळासाहेबांची शिवसेनाच खरी होती. नाहीतर आमच्या पूर्वीच्या पक्षातले साहेब बाहेर पडले नसते. हे फोटो काढण्याऐवजी पक्ष प्रमुख झालेत. त्यांच्या बोलण्याचं काय एवढं मनावर घ्यायचं?मुख्यमंत्री- त्यांच्या तोंडात दम आहे हो पण तुम्ही तर आमची दमछाकच केलीत.. बरं तो सोनाली बेंद्रेबाबत ट्विट कशाला केलंत. आधीच घातलाय तो गोंधळ कमी होता का? त्यादिवशी मुली पळवण्याबद्दल बोललात आणि आज एकदम सोनाली बेंद्रे गेल्याचा ट्विट शोभतं का तुम्हाला?
राम कदम– साहेब चुकलं हो माझं.. पायावर डोकं ठेवून माफी मागतो हवंतर फक्त एक विनंती आहे तेवढं प्रवक्तेपद काढू नका, मला बोलायला खूप आवडतं. खासकरून टीव्हीवर. माईक हातात आल्यावर तर काय बोलू आणि काय नाही असं होतं.
मुख्यमंत्री– गप्प बसा हो कारवाई केल्यासारखी तर वाटली पाहिजेच ना.. प्रवक्तेपद वगैरे काही मिळणार नाही. टीव्हीवर बोलायला तर अजिबात जायचं नाही. काय बोलायचं याचं भान तुम्ही ठेवत नाही.
राम कदम– साहेब चुकलं हो.. तुम्हाला वाटत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
मुख्यमंत्री– आता शांत राहा नाहीतर राम नाम सत्य है म्हणायची वेळ येईल आमच्यावर
राम कदम-फोन कट करत छ्या.. साहेबांना किती समाजवलं तरीही समजून घेतच नाहीत यापेक्षा मनसेत होतो तेच बरं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button