breaking-newsमहाराष्ट्र

राफेलच्या ‘गोंधळीं’ना घाबरणार नाही!

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसला इशारा

सोलापूर –देशाच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या आणि सौदेबाजी करणाऱ्या दलालांविषयी ममत्व असणाऱ्या मंडळींनी राफेलवरून या चौकीदाराला कितीही शिव्या घातल्या, सतत खोटेनाटे सांगितले, भीती दाखवली तरी मला कुणी घाबरवू शकणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सोलापूर येथे जाहीर सभेत काँग्रेस नेत्यांना दिला.

इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर आयोजित जाहीर सभेत मोदी यांनी आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात, संरक्षण खात्याच्या हेलिकॉप्टर घोटाळय़ाच्या मुद्यावर काँग्रेस व गांधी कुटुंबीयांवर आक्रमक प्रतिहल्ला केला. राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘चौकीदार चोर है’, असा आरोप करीत काँग्रेसकडून मोदी यांना लक्ष्य केले जात आहे.

मोदी म्हणाले की, ‘‘हा मोदी दुसऱ्या मातीपासून बनलेला आहे. त्याला कोणी घाबरवू शकणार नाही की खरेदी करू शकणार नाही.’’

प्रसिद्धी माध्यमांच्या हवाल्याने पंतप्रधान म्हणाले की, ‘‘ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर घोटाळय़ात भारताने ताब्यात घेतलेला दलाल ख्रिस्तियन मिशेल हा अन्य काही विमान कंपन्यांशीही लॉबिंग करीत होता, असे प्रसार माध्यमे सांगतात. आता राफेल घोटाळय़ावरून जे काँग्रेस नेते गोंधळ घालत आहेत, त्यांचे या ‘मिशेलमामा’शी कसे लागेबांधे आहेत, याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. या दलालाने आपण केवळ हेलिकॉप्टर घोटाळ्यातच नव्हे, तर पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील लढाऊ विमानांच्या घोटाळय़ातही सामील होतो, असा धक्कादायक खुलासा केल्याचे समजले आहे.’’

या मिशेलमामाच्या सौदेबाजीमुळेच पूर्वीच्या सरकारच्या काळात राफेल करार खोळंबला होता का, असा सवालही पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून केला.

जी मंडळी पिढय़ान्पिढय़ा सत्तेला जन्मसिद्ध अधिकार समजत होती, त्याच मंडळींवर आता कर बुडविल्यापासून ते संरक्षण खात्याच्या खरेदी करारातील लाचखोरीवरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची वेळ आली आहे. देशात सत्तेच्या जोरावर पूर्वी होणारी लूट गेल्या साडेचार वर्षांत रोखली गेली आहे. आता गरिबांचा पैसा थेट त्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्यातून देशाचा विकास होत आहे, असा दावा मोदी यांनी या वेळी केला.

संसदेत संमत करण्यात आलेल्या नागरिकत्व विधेयकात बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आलेल्या मुस्लिमेतर लोकांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. मात्र आसाम आणि ईशान्येकडील राज्यांतील लोकांचे कोणतेही अधिकार त्यामुळे कमी होणार नाहीत, असेही मोदी म्हणाले.

५० हजारांपेक्षा जास्त गर्दी झालेल्या या सभेत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध सहा विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख आदी उपस्थित होते. पालकमंत्री विजय देशमुख यांनी स्वागत केले. मोदी यांना पुणेरी पगडी, दोनशे वर्षांपूर्वीची भगवद्गीतेची हस्तलिखित प्रत, तलवार आणि घोंगडी देऊन गौरविण्यात आले.

वंचितांवर परिणाम नाही!

सवर्णासाठी आर्थिक निकषावर देण्यात आलेल्या दहा टक्केआरक्षणाने दलित, आदिवासी यांच्यासारख्या वंचित गटांच्या हक्कांवर परिणाम होणार नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे समर्थन केले.

काळे फुगे!

मोदी यांच्या सभांना काळे कपडे घालून येण्यावरही काही ठिकाणी बंदी घातली जात आहे. मोदी यांना सोलापुरात बुधवारी काँग्रेसतर्फे काळे झेंडेही दाखवण्यात आले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाणही केली. मात्र मोदी यांच्या निषेधात शेकडो काळे फुगे आकाशात सोडले गेल्याने हा ‘निषेध’ कसा रोखावा, असा पेच पोलिसांना पडला होता.

आडम यांच्याकडून मोदी-स्तुती

पंतप्रधान योजनेतून ३० हजार असंघटित कामगारांसाठीच्या घरकुल प्रकल्पाची पायाभरणीही या समारंभात झाली. हा प्रकल्प माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आडम मास्तर यांनी जाहीर कृतज्ञता व्यक्त केली. इतकेच नव्हे तर मे २०२२ मध्ये या घरांच्या चाव्या लाभार्थीना देण्यासाठी हेच पंतप्रधान येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कितीही अडचणी आल्या तरी चोरांना पकडण्याची ताकद या चौकीदारात नक्कीच आहे. हा चौकीदार देशाच्या प्रत्येक पै पैचा हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही. 

– नरेंद्र मोदी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button