breaking-newsराष्ट्रिय

राज ठाकरे यांच्याकडून वास्तवाचा विपर्यास !

मनसेच्या चित्रफीत शैलीला त्याच पद्धतीने भाजपचे प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांना सत्तेवरून दूर करण्याची हाक देत राज्यभर प्रचारसभा घेणाऱ्या राज ठाकरे यांनी ध्वनिचित्रफितींचा वापर करत केलेल्या हल्लय़ाला भाजपने शनिवारी आता बघाच तो व्हिडीओ असे प्रत्युत्तर दिले. वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे, अर्धवट माहिती देणारे राज ठाकरे हे अर्धवटराव असून त्यांचा खोटा प्रचार टिकणार नाही, असे शरसंधान मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केले.

‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत मोदी सरकारवर एकानंतर एक हल्ले चढवणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपने त्यांच्याच शैलीत उत्तर दिले. ‘आता बघाच तो व्हिडीओ.. खोलो इसका ‘राज’’ अशी संकल्पना घेत शेलार यांनी ठाकरे यांचे सारे आरोप खोडून काढले. राज यांनी ३२ खोटे आरोप केल्याचे नमूद करत त्यापैकी १९ प्रकरणांत राज यांनी दाखवलेल्या चित्रफिती व केलेले आरोप दाखवत त्याबाबतचे वास्तव दाखवणारे, आरोप खोडून काढणारे पुरावे मांडत आशीष शेलार यांनी प्रतिहल्ला चढवला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सोयीची ठरणारी विधाने नेमके राज ठाकरेच कसे करतात, असा सवाल करत मित्रा, तू खरेच चुकलास, असे शेलार यांनी सुनावले.

राज ठाकरे माध्यमांच्या मुस्कटदाबीचा आरोप मोदी सरकारवर करतात, पण समाजमाध्यमांवर राज यांच्यावर टीका केल्याबद्दल मनसे कार्यकर्ते घरी जाऊन मारतात, याकडे शेलार यांनी लक्ष वेधले. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसह डिसेंबर २०१७ मध्ये घेतलेल्या बैठकीचा संबंध राज यांनी कशा रीतीने सव्वा वर्षांनंतरच्या पुलवामा हल्लय़ाशी चुकीच्या पद्धतीने जोडला, याचा पुरावा शेलार यांनी दिला.

सुषमा स्वराज यांनी बालाकोटमध्ये केवळ दहशतवादी मारले गेले. पाकचे नागरिक, सैनिक नव्हे, असे विधान केलेले असताना, वाक्य तोडून मोडून सादर केले व हल्लय़ाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले, हेही शेलार यांनी दाखवले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आदी नेत्यांबद्दल राज यांनी केलेल्या अवमानकारक विधानांच्या ध्वनिचित्रफितीही शेलार यांनी दाखवल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button