breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

राज्यात ४२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

जलसाठा आणखी घटला; यंदा उन्हाच्या झळा तीव्र

मुंबई : ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या उष्म्याने पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असून राज्यातील टँकरच्या संख्येने ४०० चा टप्पा ओलांडला असून एकूण ४२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर राज्यातील पाणीसाठय़ाचे प्रमाण ६१.९६ टक्क्यांपर्यंत खाली आले असून मागच्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी पाणीसाठा आहे.

राज्यात दुष्काळी परिस्थितीवरून राजकारण तापत असून तीव्र उन्हाच्या झळांनी ग्रामीण भाग व पिके होरपळून निघत आहेत. छोटे पाणीसाठे कोरडे पडत आहेत. त्यामुळे राज्यातील टँकरची संख्या आठवडाभरात ४५ ने वाढली आहे. आता राज्यातील ३८६ गावे, ६३८ वाडय़ांना ८९ सरकारी तर ३३६ खासगी अशा एकूण ४२५ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात अवघे ८९ टँकर सुरू होते. म्हणजेच मागील वर्षीपेक्षा टँकरची संख्या सुमारे पाचपटीने वाढली आहे. राज्यात सर्वाधिक २३५ टॅंकर मराठवाडय़ात सुरू  आहेत. उत्तर महाराष्ट्रात १५२ टॅंकर, पुणे विभागात २७ टॅंकर तर अमरावती विभागात नऊ टॅंकर सुरू आहेत. राज्यातील पाणीसाठेही तीव्र उन्हामुळे वेगाने आटत आहेत. राज्यातील धरणांत मागील आठवडय़ात ६३ टक्के पाणीसाठा होता. आता तो दोन टक्क्यांनी कमी होऊन ६१.९६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मागच्या वर्षी हेच प्रमाण ७६.३९ टक्के होते. राज्यात सर्वात कमी २४.२५ टक्के पाणीसाठा मराठवाडय़ातील धरणांत आहे. मागच्या वर्षी मराठवाडय़ातील पाण्याचे प्रमाण ६९.९३ टक्के म्हणजेच अडीचपट होते हे लक्षात घेतले तर यंदाच्या पाणीटंचाईची तीव्रता लक्षात येते. आता राज्यातील लघु प्रकल्पांत ३८.६२ टक्के पाणीसाठा, मध्यम प्रकल्पांत ५१.७५ टक्के पाणीसाठा, मोठय़ा प्रकल्पांत ६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

दुष्काळाच्या इतर महत्त्वाच्या निकषांबरोबरच चाऱ्याची उपलब्धता व त्याची सरासरीच्या तुलनेत किंमत, पिण्याच्या पाण्याची टंचाई, रोजगाराची मागणी, जनावरांसाठी चारा छावण्यांची गरज, कृषी क्षेत्रातील व बिगर कृषी क्षेत्रातील वेतनाचे दर व त्यांची सरासरीशी तुलना, अन्नधान्याच्या पुरवठय़ाची परिस्थिती आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती या सामाजिक-आर्थिक निकषांचाही विचार केला जाणार आहे.

सर्वेक्षण पूर्ण.. दुष्काळ जाहीर करण्यासाठीचे सर्वेक्षण करण्यात आले असून पिकाचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी झाले असेल, भूजल पातळीत ०.४६ ते ०.६० टक्के घट झाली असेल, पाणीसाठय़ांत सरासरीपेक्षा ४० ते ६० टक्के तूट असेल, पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ६० टक्क्यांपेक्षा अधिक तूट या निकषात बसणाऱ्या तालुक्यांत तीव्र दुष्काळ जाहीर केला जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button