breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

राज्यात बुलेट ट्रेनचे काम धिम्या गतीने

संयुक्त मोजणी सर्वेक्षणावर समाधान

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात राज्यातील काम रखडले असून राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉपरेरेशनला पालघर व ठाणे जिल्ह्य़ात अद्यापही जमिनींचे संयुक्त मोजणी सर्वेक्षणावरच समाधान मानावे लागले आहे. येथून होणारा विरोध पाहता बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना फारशी गती मिळालेली नाही.

महाराष्ट्रातील मुंबईसह, ठाणे व पालघर जिल्ह्य़ातून बुलेट ट्रेन प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पासाठी राज्यातील ६५० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार असून त्यासाठी ऑक्टोबर २०१७ पासून प्रक्रिया राबविली जात होती. आतापर्यंत ७० हेक्टरचे जमीन संपादन झाले असून यात ३४ हेक्टर खासगी जमिनीचा समावेश आहे. जमीन संपादनासाठी ३१ डिसेंबर २०१८ आणि त्यानंतर ३१ मार्च २०१९ ही अंतिम मुदत ठरवण्यात आली. मात्र ती मुदतही हुकली आणि आणखी एक वर्षांची मुदत निश्चित केली आहे. आतापर्यंत राज्यात फक्त जमिनींचे संयुक्त मोजणी सर्वेक्षणाचेच काम होत आहे.

पालघर जिल्ह्य़ातील ७३ गावे बाधित होणार असल्याने यातील ३९ गावांतील संयुक्त मोजणी सर्वेक्षण मार्च २०१९ पर्यंत पूर्ण झाले होते. त्यानंतर जुलैपर्यंत आणखी चार गावांचे संयुक्त मोजणी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. त्यामुळे पालघर जिल्ह्य़ातील ४३ गावांचेच सर्वेक्षण झाले असून उर्वरित गावांचे सर्वेक्षण पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. याशिवाय ठाणे जिल्ह्य़ातील २६ गावांचाही समावेश आहे आणि त्यांच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले असून भूसंपादन व अन्य प्रक्रियांसाठी काही कालावधी लागणार आहे. मुंबईत सरकारी जमीन असून त्याची प्रक्रिया मात्र झाली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प राबविणाऱ्या राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉपरेरेशनचे व्यवस्थापकीय संचालक आचल खरे यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्य़ात भूसंपादन प्रक्रियेस काही गावांतून अद्यापही विरोधच होत आहे. त्यामुळे पालघरमध्ये जमिनींचे संयुक्त मोजणी सर्वेक्षणाचेच काम सुरू आहे. ठाणे जिल्ह्य़ात नुकतेच हे काम पूर्ण झाले आहे. काही गावांमध्ये तर एका जमिनीला चार ते पाच जणांचे नाव लागले आहे, तर काही जमिनींवर अद्यापही नाव लागलेले नाही. त्यामुळे या प्रक्रियाही पूर्ण करण्यासाठी वेळ लागत आहे.

प्रकल्प पूर्ण होण्याची अंतिम मुदत २०२३

  • बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंतिम मुदत ही २०२३ सालापर्यंतच आहे. ती २०२२ कधीच नव्हती आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीतही हेच स्पष्ट केले असल्याचे खरे म्हणाले.
  • बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण १,४३४ हेक्टर जमीन डिसेंबर २०१८ पर्यंत संपादित करून प्रकल्प १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत सेवेत आणला जाणार होता. मात्र गुजरातमधील काही भागांत प्रकल्पाच्या कामांना सुरुवात झाली असली तरी महाराष्ट्रातील कामांना अद्यापही गती नाही.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button