breaking-newsपुणे

राज्यघटनेतील कलम ४८ A चा विद्यार्थ्यांनी हा वारसा जपावा – डॉ. नवनाथ तुपे

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
आपण स्वातंत्र्याबरोबर नैतिक मूल्यांचेही भान ठेवायला पाहिजे. माणसाने निसर्गाकडून स्वातंत्र्याची व्याख्या जाणून घ्यायला हवी. राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या चतुसुत्रीच्या माध्यमातून जीवन जगण्याचा नवा मार्ग दाखविला आहे. त्यानुसार आपण माणूस बनून जीवन जगायला पाहिजे. भारतीय राज्यघटनेतील कलम ४८ A चा आदर करीत विद्यार्थ्यांनी हा वारसा जपावा, असे मार्गदर्शन डॉ. नवनाथ तुपे यांनी विद्यार्थ्यांना केले.

बहि:शाल शिक्षण मंडळ पुणे आणि रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व भूगोल विभाग आयोजित “भारतीय राज्यघटना कलम 48 A” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाचे डायरेक्टर डॉ. नवनाथ तुपे, अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रसाद मोघे, शैलजा देशपांडे, निरंजन उपासनी, डॉ. शीतल चोपडे उपस्थित होत्या. 

प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेमध्ये महत्त्वाची कर्तव्ये सांगितली असून, त्यापैकी पर्यावरण हे एक कर्तव्य आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा आदर करीत निसर्गाची जोपासना करावी असे मत व्यक्त केले. 

प्रमुख वक्ते डॉ. प्रसाद मोघे यांनी ‘हम किसीसे कम नही’ या विषयावर बोलताना सांगितले की, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केमिकलयुक्त पदार्थांचा वापर करतो. त्यामुळे आपण जागरूक होऊन त्याला पर्याय म्हणून नैसर्गिक संसाधनांचा वापर करावा. असे मत व्यक्त केले.

डॉ. शैलजा देशपांडे म्हणाल्या की, आपल्या आजूबाजूच्या भौगोलिक पर्यावरणातील प्रदूषणामुळे आपणास अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत.

डॉ. शीतल चोपडे म्हणाल्या की, आपण केमिकलयुक्त पदार्थांचा वापर करण्याऐवजी, निसर्गातील हिरडा, बेहडा, आवळा, आंबेहळद, चंदन पावडर इतर नैसर्गिक पदार्थांचा वापर करायला पाहिजे.

निरंजन उपासनी यांनी ‘नागरिकांचे अधिकार, संविधान आणि जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर, प्रा. भक्ती पाटील, प्रा. बी. एस. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश रणदिवे यांनी केले. आभार प्रा. सुशीलकुमार गुजर यांनी केले. तर, सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील  प्राध्यापक आणि बहुसंख्येने विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button