breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपुणेमुंबईराजकारण

रश्मी शुक्लांना पोलीस आयुक्तपदाची लॉटरी?

अमित शाहाच ठरवणार पोलीस आणि पालिका आयुक्त

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस यांचं युतीचं सरकार अडीच महिन्यापूर्वी सत्तेवर आलंय. शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर प्रशासकीय अनेक फेरबदल सध्या होत असल्याचं पाहायला मिळते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रश्मी शुक्ला यांना थेट मुंबई पोलीस आयुक्तपद मिळण्याची दाट शक्यता आहे. पोलीस आयुक्तपदी त्या विराजमान झाल्या नाहीत तर प्रभारी पोलीस महासंचालक असलेल्या रजनीश शेठ यांच्या जागी त्यांची नियुक्ती होण्याची अटकळ बांधली जात आहे. यापूर्वी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी किंवा राज्याच्या महासंचालकपदी नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना असायचे. मात्र आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण बसणार हे महापालिकेचे आयुक्त कोण होणार किंवा राज्याचा पोलीस महासंचालक कोण होणार याचा एकहाती निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच घेणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. येत्या आठवड्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतरच बदल्यांच्या यादीवर अंतिम मोहर उमटवतील असे समजते.

राज्य सरकारने 30 जून रोजी IPS अधिकारी विवेक फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या निवृत्तीनंतर पदभार सांभाळला होता. त्या जागी आता केंद्रात एसआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या रश्मी शुक्लांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला धोका देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली होती. या राजकीय नाट्यातील 36 दिवसांत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्लांवर आरोप आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून संजय राऊत, नाना पटोले, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केले होते. ज्या नेत्यांचे फोन टॅप केलेत, त्यांची बनावट नावं सांगण्यात आल्यानंतर रश्मी शुक्ला या अडचणीत आल्या होत्या. हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून रश्मी शुक्लांनी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. या आरोपांनंतर रश्मी शुक्ला यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआरपीएफमध्ये पाठवले होते. आता त्या पुन्हा सव्वा वर्षानंतर महाराष्ट्रात परतण्याची शक्यता आहे. तीन वर्षांचा त्यांचा प्रतिनियुक्तीचा काळ जून 2024 रोजी संपत आहे.

पण त्यांना केंद्रातून महाराष्ट्रात पाठवायचं की नाही हे आता उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असले तरी देवेंद्र फडणवीसांच्या हातात नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या ग्रीन सिग्नलनंतरच आता महाराष्ट्रात वरिष्ठ पोलिसांच्या बदल्या आणि बढत्या होणार आहेत. विशेष म्हणजे नुसते मुंबई पोलीस आयुक्त किंवा पोलीस महासंचालक नव्हे, तर मुंबई महापालिकेचे आयुक्तही आता अमित शाहांच्या मर्जीनुसारच बनवले जातील, अशी माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांकडून कळते. येत्या सहा महिन्यात मुंबई महापालिकेसह राज्यात 15 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आपल्या मर्जीतील अधिकारी त्या त्या शहराच्या पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तपदी असावेत, अशी रणनीती भाजपकडून आखली जात आहे. रश्मी शुक्ला यांना मुंबईचे पोलीस आयुक्तपद, राज्याचे पोलीस महासंचालकपद किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक यापैकी एका पदावर बसवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. तसेच साईड पोस्टिंगला असलेले देवेन भारती, ब्रिजेश सिंग, विनय चौबे, आशुतोष डुंबरे यांना ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तपदी बसवण्याचे घाटत आहे.

तसेच दोन वर्षे कार्यकाळ पूर्ण केलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्याही लवकरच बदल्या करण्यात येणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशिया दौऱ्यावरून परतल्यानंतर बदल्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब केला जाईल. या बदल्यांमध्ये भूषण उपाध्याय, सदानंद दाते, बिपीन कुमार सिंग, विनय कारगावकर, अमिताभ गुप्ता, आशुतोष डुंबरे, सुखविंदर सिंग, व्ही. के. चौबे, अमितेश कुमार, रविंदर कुमार सिंगल, विश्वास नांगरे पाटील, राजकुमार व्हटकर, के एम प्रसन्ना, एम. एस लोहिया, व्ही जाधव, लखमी गौतम, संजय दराडे, ज्ञानेश्वर चव्हाण, एस. एच. महावरकर, एन. पी. तांबोळी, चंद्रकिशोर मीना, आरती सिंग, सचिन पाटील या दोन डझनभर आयपीएस अधिकाऱ्यांच्याही लवकरच बदल्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पोलीस विभागातही मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button