breaking-newsपुणेमहाराष्ट्र

रवींद्र मराठे यांच्यावरील कारवाई आततायीपणाची

  • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गृहखात्यावर टीका

पुणे – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरून बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना अटक करताना पोलिसांनी आततायीपणा दाखवला आहे. पुण्याचे पोलीस म्हणजे कायदा हातात घेऊन त्याचा गैरवापर करण्याचे उदाहरण आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोलीस आणि गृहखात्यावर टीका केली.

अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या राजर्षि शाहू अकॅडमीच्या वतीने शाहू महाराजांच्या जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पवार पत्रकरांशी बोलत होते. संपूर्ण बॅंकिंग प्रणालीवर लक्ष ठेवण्याचा कायदेशीर अधिकार रिझर्व्ह बॅंकेला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्याची भूमिका आजपर्यंत कोणी घेतली नाही. पुण्याच्या पोलिसांनी “आरबीआय’ला न कळवता मराठे यांना अटक केल्याने पुण्याचे पोलीस अधिक “जागरूक’ दिसत आहेत. या सर्व प्रकारावरुन कायदा हातात घेऊन कायद्याचा गैरवापर करण्याचे उदाहरण पुणे पोलिसांनी घालून दिले आहे, असा टोला पवार यांनी लगावला.

राजर्षी शाहू अकॅडमीतून मार्गदर्शन घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेवारांचा सत्कार शरद पवार आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने वाटचाल करण्याचा माझा प्रयत्न आहे. कोल्हापूरच्या एकूण उत्पादनाच्या 23 टक्के इतका खर्च राजर्षी शाहू महाराज शिक्षणावर करीत असत. सामाजिक स्वातंत्र्यासाठी नेहमीच शाहू महाराजांनी लढा दिला. यावेळी आपल्या खासदार फंडातून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी 50 लाख रुपये देत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button