breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

”ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है”; खासदार अमोल कोल्हेंचा पिंपरी चिंचवड भाजपला सूचक इशारा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी तयारी सुरु

पिंपरी |महाईन्यूज| प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटीचा वाजविलेला ढोल, कोरोना महामारीतील नियमबाह्य केलेली खरेदी, स्वच्छता अभियानात स्मार्ट सिटीची झालेली घसरण यासह अन्य मुद्द्यांवरुन भाजपला घेरले जाणार असून ”ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है, असं सुचक वक्तव्य शिरुरचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

महानगरपालिका निवडणुका आणि पक्ष संघटन मजबूत करण्याच्या अनुषंगाने शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आकुर्डीत आज (शुक्रवार) पार पडला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, नाना काटे, नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा धर-शिलवंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार कोल्हे म्हणाले की, कोरोना महामारीत नागरिकांच्या आरटीपीसीआर रिपोर्ट वेळेवर मिळत नव्हते. त्या संबंधित अधिका-यांच्या अक्षम्य चुकांमुळे काहींना मृत्यूला सामोरे जावे लागले. कोरोना संकटात नियमबाह्य खरेदी करत काहींनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे. सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटीचा ढोल बडविला. पण मागील साडेतीन वर्षात त्या स्मार्ट सिटीचं फलित काय झाले, त्यात नेमकं पाणी कुठं मुरलंय हे बघायचे आहे. शहराला दररोज पाणी पुरवठा होत नाही. अमृत योजनेतील चोवीस तास पाण्याचे काय झालं. शहर स्वच्छता अभियानात स्मार्ट शहराची घसरणचं झालेली आहे.

यासह पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारांचा प्रश्न, एमआयडीसीतील लघू उद्योजकांचे प्रश्न यासह सगळ्या प्रश्नांची उत्तरे सत्ताधा-यांना यापुढील काळात द्यावे लागतील. त्यामुळे महानगरपालिकेत यापुढे राष्ट्रवादी काॅंग्रेस अधिक आक्रमकपणे भूमिका मांडून धार वाढवेल. तसेच लोकांच्या हिताचा, कल्याणासाठी विरोधी पक्षाच्या दालनात मी बसलेलो असेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button