breaking-newsराष्ट्रिय

येडियुरप्पा यांचा अल्पपरिचय…

  • सरकारी क्‍लार्कपासून वादात राहूनही तिसऱ्या मुख्यमंत्री पदापर्यंत

बेंगळूरु – तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारलेल्या बी.एस. येडियुरप्पा हे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या भविष्याबाबत रात्रभर विचार सुरू राहिला होता. सरकारी कार्यालयातल्या निरस वातावरणामधील क्‍लार्क राहिलेले आणि एका हार्डवेअर दुकानाचे मालक असलेले येडियुरप्पा यांनी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत तिसऱ्यांदा मजल मारली आहे. एखाद्या कसलेल्या नावाड्याप्रमाणे त्यांनी राजकीय विरोधकांचे प्रवाह कापत आपली नौका हाकली आहे.

बुकनकेरे सिद्धलिंगप्पा उर्फ बी.एस. येडियुरप्पा हे वयाच्या 15 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून दाखल झाले. त्यानंतर शिवामोगा जिल्ह्यातल्या शिकारिपुरा गावात तत्कालिन जनसंघाच्या कामामध्ये सहभागी होऊन त्यांनी आपल्या राजकीय जाणीवा स्पष्ट केल्या. 1970 साली त्यांच्यावर शिकारीपुरा तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली गेली होती. त्यानंतर 1983 मध्ये येथूनच त्यांनी प्रथम विधानसभेची निवडणूक जिंकून कर्नाटक विधानसाभेमध्ये प्रवेश केला होता. याच मतदारसंघातून ते 5 वेळा विधानसभेवर निवडून गेले.

लिंगायत समाजाचे प्रतिनिधी असलेल्या येडियुरप्पा यांनी नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात याचा वारंवार उल्लेखही केला आहे.
कला शाखेची पदवी घेतल्यावर येडियुरप्पा यांनी आणीबाणीदरम्यान तुरुंगवासही भोगला. समाज कल्याण खात्यात क्‍लार्क झाल्यावर त्यांनी भातगिरणी आणि हार्डवेअर दुकान सुरू केले. 2004 मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने तेंव्हाच येडियुरप्पा मुख्यमंत्री बनू शकले असते. मात्र कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने मिळून धरम सिंहांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. राजकीय शहाणपण दाखवून येडियुरप्पा यांनी 2006 साली कुमारस्वामी यांच्याबरोबर हातमिळवणी केली आणि धरम सिंहांचे सरकार उलथवले. कुमारस्वामी आणि येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा काळ वाटून घेतला होता.
नोव्हेंबर 2007 मध्ये येडियुरप्पा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले मात्र कुमारस्वामी सरकारमधून बाहेर पडल्याने त्यांचे सरकार केवळ 7 दिवसच टिकले. 2008 च्या निवडणूकीत भाजपने सत्ता मिळवल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र लोकायुक्‍तांनी बेकायदा खाण उद्योगात सहभागी असल्याचा ठपका ठेवल्याने त्यांना पद सोडावे लागले होते. मुलाला बेंगळूरु येथील जागा मुलाला मिळवून दिल्यानेही ते वादात सापडले. खाण उद्योग गैरव्यवहार प्रकरणी त्यांना आठवड्याभराचा तुरुंगवासही झाला. या सर्व घडामोडींनंतर भाजपची साथ सोडून त्यांनी कर्नाटक जनता पक्ष स्थापन केला. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी दोन्ही पक्ष एकत्र झाले आणि येडियुरप्पा पुन्हा भाजपवासी झाले. लोकसभेसाठी 28 पैकी 19 जागा जिंकून त्यांनी भाजपला मोठे यश मिळवून दिले. यथावकाश 2016 साली सीबीआयने त्यांना आणि कुटुंबियांना बेकायदेशीर खाण उद्योग प्रकरणातून निर्दोष मुक्‍त केले.
कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचा एकाचवेळी सामना करताना येडियुरप्पा यांनी भाजपला दक्षिणेत दिग्विजय मिळवून दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button