आंतरराष्टीयताज्या घडामोडी

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत जयपूर शहराचा समावेश

गुलाबी रंगाचे शहर म्हणून ओळख असलेल्या जयपूरला शनिवारी युनेस्को वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे. वास्तुरचना  व संवेदनशील संस्कृती यांचा वारसा जयपूरला लाभलेला आहे. युनेस्कोने ट्विटमध्ये म्हटले आहे,की  राजस्थानातील जयपूर शहराची निवड वारसा स्थळांच्या यादीत केली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक अझरबैजान येथील बाकू येथे ३० जूनला सुरू झाली असून  १० जुलै  पर्यंत चालणार आहे. त्यात जयपूर शहराच्या प्रस्तावावर विचार करण्यात आला व त्यानंतर या शहराला यादीत समाविष्ट करण्यात आले.

जागतिक वारसा यादीत जयपूरची निवड झाल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत  केले आहे. त्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, जयपूर शहराचा संबंध हा संस्कृती व शौर्याशी आहे. जयपूरचे आदरातिथ्य व त्याचे सौंदर्यही वेगळे आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले,की ‘दी इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मोन्युमेंट्स अँड साइट्स’ या संस्थेने २०१८ मध्ये जयपूर शहराची पाहणी केली होती. त्याआधारे जयपूरच्या नामांकनाचा बाकू येथील बैठकीत विचार करण्यात आला. युनेस्को वारसा समिती ही २१ सदस्यांची असून त्यांची बैठक दरवर्षी होते. आतापर्यंत १६७ देशातील १०९२ ठिकाणांची निवड युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये झाली आहे.

जयपूरच का?

जयपूर हे राजस्थानातील ऐतिहासिक शहर असून त्याची स्थापना सवाई जयसिंग द्वितीय यांनी इ.स १७२७ मध्ये केली. सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न असलेल्या राजस्थानची ती राजधानी असून शहर नियोजन व वास्तूकला या मुद्दय़ांवर जयपूरची शिफारस करण्यात आली होती. जयपूर शहर  हे मध्ययुगीन व्यापार शहराचे दक्षिण आशियातील प्रतीक असून व्यापाराच्या नव्या संकल्पना तेथे उदयास आल्या. येथील पारंपरिक कलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button