breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

युती करा, पण मावळ मतदार संघ भाजपलाच सोडा!

  • मावळातील भाजपच्या प्रमुख पदाधिका-यांची मागणी
  • स्वबळावर लढण्याचीही दाखविली तयारी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप प्रदेशाध्यक्षांकडून राज्यातील लोकसभा मतदार संघाचा मॅरेथॉन दौरा सुरू आहे. मावळ मतदार संघातील पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज लोणावळ्यात पक्षाची बैठक झाली. शिवसेना-भाजप युतीची चिन्हे दिसत असल्याने पदाधिका-यांनी सर्व गोष्टी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर उघडपणे मांडल्या. युती व्हावी किंवा होऊ नये, याबाबत आमचे काही म्हणणे नाही. परंतु, युती झाली तर मावळ मतदार संघ भाजपलाच सोडावा. युतीशिवाय स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, असा एकत्रीत सूर मावळातील पदाधिका-यांमध्ये उमटला.

मावळ मतदार संघात शिवसेनेचे प्राबल्य असल्यामुळे भाजपला काही करून हा मतदार संघ स्वतःकडे घ्यायचा आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या मतदार संघात अनेक बैठका घेतल्या आहेत. पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज बुधवारी (दि. 23) लोणावळा येथे एका हॉटेलमध्ये पक्षाच्या पदाधिका-यांची बैठक झाली. यावेळी संघटन मंत्री विजय पुराणीक, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, प्रशांत ठाकूर, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खीडे, माजी खासदार राम ठाकूर, उमा खापरे, बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या शिवसेना-भाजप युती होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे मावळातील भाजपचे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यासमोर मोकळ्या मनाने बोलले. मावळ मतदार संघ शिवसेनेकडे असला तरी पक्षाचे काम याठिकाणी जोरात आहे. तालुका स्तरावर बुथ प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला घराघरापर्यंत पोहोचविले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला धोबीपछाड करायला वेळ लागणार नाही. याती करावी किंवा नाही, याबाबत आमचे म्हणणे नाही. परंतु, युती झाली तर मावळ मतदार संघ भाजपकडे ठेवावा, असा सूर पदाधिका-यांमध्ये उमटला. त्यामुळे शिवसेनेचा शिरस्ता असताना भाजपच्या पदाधिका-यांचा आत्मविश्वास कमालीचा बळावल्याचे दिसते.

उमेदवाराबाबत अद्यापही साशंकता

युती झाल्यानंतर मावळ मतदार संघ भाजपलाच सोडा असे पदाधिका-यांचे म्हणणे असले तरी भाजपचा उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप की आमदार बाळा भेगडे राहणार याबाबत मात्र, आजच्या बैठकीत चर्चा झाली नाही. भेगडे यांनी लोकसभेची जोरात तयारी केली आहे. तर, जगताप देखील मैदानात उतरले आहेत. या दोघांपैकी भाजपची उमेदवारी कोणाला दिली जाणार, हे अद्याप ठरलेले नाही. जर, या दोघा आमदारांना डावलून तिसराच उमेदवार लादल्यानंतर पदाधिकारी नवख्या उमेदवारांचे काम करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button