breaking-newsमनोरंजन

..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा

आपल्या कुशल विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिकेचा आज वाढदिवस. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात तुम्ही त्याचं अभिनय पाहतच असाल पण त्याच्याविषयी लहानमोठ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर हे नक्की वाचा. फावल्या वेळेत कुशल काय करतो, त्याच्यासाठी विनोद म्हणजे नक्की काय आहे, व्यायामाबद्दल त्याचं काय मत आहे हे सर्व कुशलने सांगितलं आहे.

”प्रत्येक घटनेमध्ये एक विनोद असतो. तो विनोद प्रत्येकाने शोधायला हवा. विनोद शोधण्याच्या प्रक्रियेतच आपला अर्धा ताण हा दूर होतो. मलाही ताण येतो. मात्र तो ताण दूर करण्यासाठी माझ्याकडे अनेक उपाय आहेत. मी आठवडाभराच्या व्यस्त कामातून दोन दिवसांची आवर्जून सुट्टी घेतो. त्या सुट्टीदरम्यान मी कोणाशीच संपर्क साधत नाही. माझा पूर्णवेळ मी माझ्या कुटुंबाला देतो. सुट्टीच्या दिवशी मी माझ्या कुटुंबासमवेत उनो आणि लुडो खेळ खेळतो. अनेकदा एखाद्या कार्यक्रमाच्या तालमीदरम्यान आरामासाठी बराचसा वेळ असतो. या वेळेत मी माझा लॅपटॉप काढून त्यावर वेब सिरीज पाहतो. मला वेब सिरीज पाहायला प्रचंड आवडतात. ज्या वेळी मी थकलेलो असतो त्या वेळेस मी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ पाहतो. ताण दूर करण्यात नेटफ्लिक्सचाही वाटा आहे. नुकताच पाऊस सुरू झाला आहे. मी अनेकदा घरी असल्यावर सायंकाळी घराबाहेर फेरफटका मारायला जातो. दरम्यान थंडगार वातावरण मनावरील मळभ दूर करते. मला माझ्या कामातून ताण हा कधीच येत नाही. मी माझ्या कामातून कधीच थकत नाही. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात जेव्हापासून अभिनय करतोय तेव्हापासून तर कधीच काम करताना थकायला होत नाही.”

”अभिनय करताना प्रत्येक पात्र मी अनुभवत असतो. प्रत्येक पात्र हे काहीतरी शिकवणारे असते. एक वेगळा अनुभव देणारे असते. मी ताण दूर करण्यासाठी अनेकदा प्रवासात वाचनदेखील करतो. मला निरनिराळ्या लेखकांची पुस्तके वाचायला आवडतात. अनेकदा मी विनोदी लेखन वाचतो. मी व्यायामास सुरुवात केली आहे. व्यायामाने थकवा दूर होतो. अनेकदा अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती या चित्रीकरणाच्या वेळेत अधिक व्यस्त असल्याचे दिसून येते. व्यस्त कामातून स्वत:साठी वेळ मिळत नसल्याचे अनेकदा कुजबुज करत असतात. मात्र मला असे वाटते की व्यस्त कामातूनदेखील स्वत:ला ताणमुक्त करायला हवे. मी ज्या क्षेत्रात काम करतो ती माझी आवड आहे, म्हणूनच मी हे क्षेत्र निवडले आहे. मी माझे काम  मनापासून करतो हीच माझी एकप्रकारे ध्यानधारणा आहे. ताणमुक्तीसाठी प्रत्येकाने आयुष्यातील प्रत्येक क्षण हा स्मरणात ठेवायला हवा.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button