breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोहननगरसह अनेक भागात कृत्रिम पाणी टंचाई

पिंपरी – शहरातील मोहनमनगर, रामनगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे. पाणी पुरवठा करण्यामध्ये देखील गलिच्छ, कुरघोडीचे राजकारण केले जात आहे, असा आरोप माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी केला आहे. या परिसरात पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा. अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महापालिकेचे प्रभारी आयुक्त किरण गित्ते यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, महात्मा फुलेनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. महापालिका प्रतिदिन 490 ते 495 द.ल.लि . पाणीपुरवठा करते. पवना धरणात 32 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 15 जुलै पर्यंत पूर्वी प्रमाणेच महापालिका शहराला पाणी पुरवठा करू शकते. प्रभाग क्र. 14 काळभोर नगर या भागालागतच्या प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत होतो. परंतु सदर परिसरात मात्र विस्कळीत, कमी दाबाने, व अपुरा पाणीपुरवठा होत असून यामध्ये कुरघोडीचे राजकारण होत असल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे. तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी जाणीवपूर्वक टॅंकर माफियांच्या भल्यासाठी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मानसिक व आर्थिक झळ बसत आहे.

मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, महात्मा फुले नगर आदी परिसरात अत्यंत कमी दाबाने व अपुरा होणारा पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा. अन्यथा परिसरातील नागरिकांना घेऊन पालिकेसमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा मारूती भापकर यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button