breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मोसमी पावसासाठी पोषक वातावरण

शनिवारी केरळमध्ये; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये अरबी समुद्रात चांगली प्रगती केली असून, श्रीलंकेचा निम्मा भागही व्यापला आहे. दक्षिण भारतात हवेच्या मधल्या थरात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र तयार झाले आहे. ही पोषक स्थिती लक्षात घेता मोसमी वारे शनिवापर्यंत (८ जून) केरळमार्गे भारतात दाखल होतील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वारे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्राकडील वाटचाल निश्चित होऊ शकणार आहे.

मोसमी वाऱ्यांच्या अंदमानातील आगमनाची सुवार्ता १८ मे रोजी मिळाली होती. मात्र, त्यानंतर सुमारे आठवडाभर त्यांची पुढची वाटचाल रखडली होती. २५ मेपासून काहीशी वाटचाल सुरू झाली. त्यानंतर ३० मे रोजी मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण अंदमान व्यापत अरबी समुद्रात वाटचाल केली होती. गेल्या दोन दिवसांमध्ये त्यांनी श्रीलंकेतील काही भागात प्रगती केली. ३ जूनला अरबी समुद्रात प्रगती करीत श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत पोहोचलेल्या मोसमी वाऱ्यांनी मालदीव बेटे आणि कोमोरीन भागासह बंगालच्या उपसागरात प्रगती केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत म्हणजे ५ जूनला वाऱ्यांनी श्रीलंकेतील कोलंबोच्या उत्तरेकडील भाग व्यापला आहे. बंगालच्या उपसागरातही त्यांनी प्रगती केली आहे.

पाऊसभान..

विषुववृत्ताकडून येत असलेले वाऱ्यांचे प्रवाह, दक्षिण भागात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर असलेले हवेचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र यामुळे ८ जूनला मोसमी वारे केरळमध्ये पोहोचण्यास पोषक हवामान निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरावरील मान्सूनची शाखा रविवापर्यंत (९ जून) ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पोहोचण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळी स्थिती आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे साठे कोरडे पडले आहेत. पूर्वमोसमी पाऊस काही ठिकाणी बरसत असला, तरी त्याचे प्रमाण कमी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button