breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसचे रणशिंग

कार्यकारिणीची आज अहमदाबादमध्ये बैठक

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर दोनच दिवसाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमधूनच काँग्रेस निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असून, मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळावर कोरडे ओढत विजयाचा निर्धार केला जाणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च अशा कार्यकारिणीची बैठक उद्या अहमदाबादमध्ये होणार आहे. गुजरातमध्ये तब्बल ५८ वर्षांने होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकीच्या व्यूहरचनेच्या संदर्भात चर्चा होणार आहे. पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यावर प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत होणारी हे पहिलीच कार्यकारिणीची बैठक आहे. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील सर्व २६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली लढत दिली होती. परिणामी भाजपला  तिहेरी आकडा गाठणे शक्य झाले नव्हते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयाने गुजरातमध्ये काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यंदा गुजरातमध्ये पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केला.

पुलवामा हल्ला आणि त्यानंतर बोलाकोटवर भारतीय हवाई दलाने केलेला बॉम्बहल्ला यामुळे देशातील वातावरण बदलले आहे. भाजपने राष्ट्रभक्तीचा मुद्दा करीत त्या आधारे मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. राफेल, शेतकऱ्यांची नाराजी आदी विषय यातून मागे पडले. हे मुद्दे पुन्हा लोकांसमोर अग्रक्रमाने कसे आणायचे यावर काँग्रेसला प्राधान्य द्यावे लागेल. निवडणूक व्यूहरचनेवर चर्चा करण्यात येणार आहे. गांधीजींच्या भूमीतून देशातील नागरिकांना एक वेगळा संदेश देण्याची काँग्रेसची योजना आहे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर होणाऱ्या जाहीर सभेत पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. हार्दिक पटेल हे अधिकृतपणे काँग्रेसमध्ये सहभागी होत असल्याने त्याचा पक्षाला राजकीय लाभ होऊ शकतो. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीच्या तोंडावर तीनआमदारांना फोडून भाजपने काँग्रेसला धक्का दिला आहे. मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा सवाल उद्याच्या जाहीर सभेत राहुल गांधी करणार आहेत. याशिवाय राफेल विमान खरेदी घोटाळा, शेतकऱ्यांची नाराजी, बेरोजगारी, वस्तू आणि सेवा करामुळे व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान आदी मुद्दय़ांवर भाजप सरकारला घेरले जाईल.

गुजरात काँग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा

काँग्रेस कार्यकारिणी समितीची मंगळवारी येथे बैठक होत असतानाच त्याच्या पूर्वसंध्येवर सोमवारी गुजरातमधील काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जामनगर (ग्रामीण) मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार वल्लभ धाराविया यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे सादर केला. गेल्या चार दिवसांत काँग्रेसच्या तिसऱ्या आमदाराने सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button