breaking-newsराष्ट्रिय

मोदींच्या 90 वर्षीय आत्याला दवाखान्याच्या भाडेकरार नुतनीकरणाची चिंता !!!

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आत्या असल्याचा दावा करणाऱ्या 90 वर्षीय ज्येष्ठ महिलेला आपल्या घराच्या आवारात चालणाऱ्या सरकारी दवाखान्याच्या भाडेकराराच्या नुतनीकरणासाठी आता श्रम मंत्रालयाकडे खेपा घालाव्या लागत आहेत. आपल्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे मिळवण्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकारात अर्जही केला आहे. मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे मिळू शकलेली नाहीत. दहिबेन नरोत्तमदास मोदी असे या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्यांची कैफियत ऐकवण्यासाठी ईश्‍वरलाल मोदी या गृहस्थांना तिने माहिती आयुक्‍त श्रीधर आचार्युलू यांच्याकडे पाठवले आहे. दहिबेन यांच्या घराच्या आवारामध्ये 11 एप्रिल 1983 पासून सरकारी दवाखाना सुरू असून त्यापोटी दहिबेन यांना महिन्याला 600 रुपये भाडे मिळणे अपेक्षित आहे. गुजरातमधील मेहसणा जिल्ह्यातील वरदनगर येथील हा दवाखाना बिडी कामगारांच्या कल्याण निधीतून चालवण्यात येतो.

1983 ते 1998 दरम्यान भाडेकराराचे वेळोवेळी नुतनीकरण झाल्यावर भाडेपट्टी 600 रुपयांनी वाढून 1500 रुपये झाली. मात्र त्यानंतर या भाडेपट्टीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही, असे दहिबेन यांचे म्हणणे आहे. दहिबेन यांनी गेल्यावर्षी माहितीच्या अधिकारातील अर्ज करून भाडेकरारचा तपशील, नुतनीकरण, भाडेनिश्‍चितीचे निकष आणि गेल्या पाच वर्षात नुतनीकरण न करण्यामागील कारणांची विचारणा केली होती. तसेच पाच वर्षांच्या थकबाकीचे पैसे आपल्याला मिळणार की नाहीत, याबाबतही त्यांनी विचारणा केली होती. मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने हे प्रकरण माहिती आयुक्‍तांकडे गेले. आपण उपजिविकेसाठी या तुटपुंज्या भाड्यावरच अवलंबून असल्याचे दहिबेन यांनी म्हटले आहे.

करार नुतनीकरणासाठी 2002 आणि 2008 मध्ये नव्याने कागदपत्रे दाखल करण्यास सांगण्यात आले होते. मात्र कागदपत्रे जमा न केल्यामुळे भाड्याचे नुतनीकरण होऊ शकले नाही, असे कल्याण आणि उपकर आयुक्त एस.एस. अहलुवालिया यांनी सांगितले, मात्र आपल्याला अपेक्षित माहिती मिळत नाही, तोपर्यंत कागदपत्रे जमा केली जाणार नाहीत, असे दहिबेन यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. दहिबेन या वृद्ध असून स्वतः दरवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊ शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. आपल्याला या वयामध्ये होणाऱ्या मानसिक त्रासाबाबत दहिबेन यांनी उद्‌वेग व्यक्‍त केला आहे. आपल्याला संबंधित माहिती मिळण्यासाठी त्यांनी माहिती आयुक्‍तांकडे दुसऱ्यांदा अपील केले आहे. त्यांच्या पहिल्या अर्जाला उत्तरात ही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधानांची आत्या असल्याचा उल्लेख 
आपल्या दुसऱ्या अपीलामध्ये दहिबेन यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आत्या असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र त्यांनी पंतप्रधानांबरोबरचे नेमके नाते स्पष्ट केलेले नाही. माहिती आयुक्‍तांनी या दुसऱ्या अपीलाची दखल घेतली असून कनिष्ठ अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचे ताशेरे ओढले आहेत. माहिती अधिकार अर्जाला योग्य उत्तर न दिल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर दंड आकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button