breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मेट्रोचा विस्तार वाघोलीपर्यंत!

  • डीपीआर करण्यास स्थायी समितीची मान्यता
  • लोहगाव विमानतळापर्यंत होणार विस्तार

पुणे – पुणे मेट्रोचा वनाज ते रामवाडी हा मार्ग आता वाघोलीपर्यंत तसेच रामवाडी ते लोहगाव विमानतळापर्यंत विस्तारणार आहे. या दोन्ही मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यास स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठीचा खर्च महापालिका देणार आहे.

शहरामध्ये सध्या महामेट्रोकडून दोन मार्गांचे काम करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वारगेट-कात्रज मार्गाचा “डीपीआर’ महामेट्रोने तयार केला आहे. सध्याच्या मेट्रो मार्गामुळे रामवाडीपर्यंतच्या वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. रामवाडीपासून पुढे खराडी, वाघोलीपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने लोकसंख्या व वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या भागात आयटी क्षेत्रातील कंपन्यांची संख्याही मोठी आहे. या कंपन्यांमधून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्‍यक असणारी सार्वजनिक वाहतुकीची सेवा पुरेशी नाही. तसेच लोहगाव विमानतळावर हवाई वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने प्रवाशांची मोठ्या संख्येने वर्दळ वाढली आहे. हा परिसर विकसित झाल्याने नागरीकरण वाढले आहे. भविष्य काळातील विकासाच्या दृष्टीने रामवाडी ते वाघोली व रामवाडी ते विमानतळ या दोन्ही मार्गांवर मेट्रो प्रकल्प सुरू करण्यासाठी त्याचा “डीपीआर’ लवकरात लवकर करावा, यासाठी समिती सदस्यांनी प्रस्ताव दिला होता. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

लवकरच सर्वेक्षण सुरू होण्याची अपेक्षा

या मेट्रो विस्तारीत मेट्रो मार्गांचा “डीपीआर’ करावा व त्यासाठी आवश्‍यक खर्च महापालिकेकडून दिला जाईल, याचे पत्र तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी जानेवारीमध्येच महामेट्रोला दिले होते. त्यानंतर महामेट्रोने त्याबाबत तत्वत: मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर महामेट्रोने फक्‍त स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत मार्गाचाच “डीपीआर’ केला आहे. त्यासाठी आवश्‍यक खर्च देण्यासही स्थायी समितीने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या नवीन मार्गासाठीही समितीने मान्यता दिली असून त्याबाबत लवकरच सर्वेक्षण सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button