breaking-newsमहाराष्ट्र

मृत लाकडावर जगणाऱ्या कीटकप्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

नागपूर : जंगलातील इतर झाडांना किड लागू नये म्हणून मृत झाडे काढून टाकण्यात येतात. परिणामी, जगभरातच या झाडांवर जगणारे कीटक आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या लाल यादीत (आययूसीएन) ‘लुप्तप्राय’ गटात त्याची नोंद झाली आहे.

जंगलातील जुने वृक्ष नैसर्गिकरित्या नाहीसे होऊ न देता, ते आधीच तोडले जात असतील तर या मृत लाकडावर जगणारी कीटकांची प्रजाती देखील नाहीशी होऊ शकते. यासंदर्भात सर्वेक्षण करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सुमारे ७०० कीटकांच्या प्रजातीचा अभ्यास केला. त्यात त्यांना १८ टक्के प्रजाती या धोक्यात सापडलेल्या आढळून आल्या. ही टक्केवारी अधिक होती कारण अभ्यास करण्यात आलेल्या कीटकांच्या प्रजातींपैकी एक तृतीयांश प्रजातींमध्ये वर्गीकरण करण्यासाठी पुरेशी माहिती नव्हती. सॅप्रॉक्झिलिक कीटकांच्या तीन हजार प्रजातींना त्यांच्या जीवनचक्रात काही वेळेस मृत आणि मृतवत लाकडांची गरज भासते. पर्यावरणात कीटकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. कीटकांशिवाय हे निसर्गचक्र पूर्ण होऊ शकत नाही. पक्षी आणि सस्तन प्राण्यांसाठी कीटक हे महत्त्वाचे अन्नाचे स्रोत आहे. जंगलच नाही तर विविध ठिकाणी असणाऱ्या जुन्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखावे लागणार आहे. कीटकांच्या माध्यमातून पुरवली जाणारी परिस्थितिकी सेवा म्हणजेच निसर्गचक्र सुरळीत सुरू राहील किंवा नाही हे त्यावरून कळेल, असे आययूसीएनच्या जागतिक प्रजाती कार्यक्रमाचे संचालक जेन स्मार्ट यांचे म्हणणे आहे. ८० तज्ज्ञांच्या संशोधनावर आधारित अहवालानुसार, मृतप्राय वृक्ष तोडण्यात आल्याने कीटकांच्या प्रजातीत घट झाली आहे. कीटकांसह इतर वन्यजीवांचे अस्तित्वही वाढते शहरीकरण, पर्यटन विस्तार, भूमध्य क्षेत्रातील जंगलाला लागणाऱ्या आगीची तीव्रता आणि वारंवारता वाढत चालल्यामुळे  धोक्यात आले आहे.

शासनाकडे आकडेवारीच नाही

मृत झाडांना पोषक असणाऱ्या कीटकांवर महाराष्ट्रात अधिक संशोधन झालेले नाही. त्यामुळे  त्यांच्या किती प्रजाती आहेत याचीही माहिती नाही. महाराष्ट्रातील नेमक्या किती प्रजाती लाल यादीत आहे हे सांगणे सुद्धा कठीण आहे. शासनाकडे याची आकडेवारी उपलब्ध नाही. व्याघ्र प्रकल्पाव्यतिरिक्त इतर जंगलात मोठय़ा प्रमाणात असे वृक्ष तोडले जातात. तसेच वनवणव्यात सुद्धा मोठे नुकसान होते. मृत झाड व कीटकसृष्टी हे परस्परपूरक आहेत. यावर संशोधन व त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

– यादव तरटे पाटील, निसर्ग अभ्यासक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button