TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावरून गाजणार हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास नियोजन प्राधिकरण भूखंड वितरण घोटाळ्यावरून विधिमंडळाचा दुसरा दिवस वादळी ठरला. या प्रकरणावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. हाच मुद्दा घेऊन विरोधक आजही विधिमंडळात आक्रमक पाहायला मिळतील. तर, विरोधकांवर पलटवार करण्यासाठी सत्ताधारीही सज्ज झाले आहेत. याशिवाय, आजचा दिवस कोणत्या मुद्द्यांवरून गाजतोय हे पाहावं लागेल.

सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहाने लवकर काम गुंडाळले. मात्र, दुसरा दिवस वादळी ठरला. सभागृहात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विकासकामे, रस्तेविकास, रुग्णालयांचा विकास, मुंबईचा कायापालट, समृद्धी महामार्ग, श्रद्धा वालकर प्रकरण, लव्ह जिहादविरोधी कायदा या विविध मुद्द्यांवरून विधानसभा गाजली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे देत विकासकामे जलदगतीने करण्याचे आश्वासन दिले.

तर, दुसरीकडे विधान परिषदेत फक्त नागपूर भूखंड घोटाळा प्रकरणावरच चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पॉइंट ऑफ इन्फोर्मेशनअंतर्गत नागपूर भूखंड घोटाळा प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले. यावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना पलटवार करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू लावून धरली. विधान परिषद तहकूब झाल्यानंतर हा मुद्दा विधानसभेत गेला. तिथेही यावरून प्रचंड गदारोळ झाला. अखेर, बोलू दिले जात नाही या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांचा सभात्याग झाल्यानंतर अर्ध्या तासांनी विधानसभेचं कामकाजही स्थगित झाले. त्यानंतर विरोधक-सत्ताधारी यांनी विधान भवनाच्या आवारातच माध्यमांसमोर एकमेकांवर आगपाखड करत स्वतःची बाजू लावून धरली.

तिसऱ्या दिवशी कोणते मुद्दे छेडले जातात, विरोधक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अडून बसतात का, नवे प्रस्ताव पटलावर येतात का, किती तारांकित प्रश्न उपस्थित केले जातात हे पाहावं लागणार आहे. आज, तिसऱ्या दिवशी ११ मोर्चे निघणार आहेत. यामध्ये लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीकडूनही मोर्चा निघणार आहे. मुस्लिम आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी एमआयएमने मोर्चाचे नियोजन केले आहे. तर, इतर छोटे-मोठे मोर्चेही आज विधान भवन परिसरात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button