breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘हे’ मुद्दे मांडले!

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:


हे युद्ध चालू आहे, मला लता दीदींच्या एका गाण्याची आठवण आली, संपूर्ण जगाची अवस्था ‘सरणार कधी रण?’ याच परिस्थितीत आहे. वाट बघतोय आपण हे रण संपणार कधी?

हे युद्ध लढताना शत्रू समोर असेल तर आतापर्यंत आपण हिंदुस्तानी, माझे महाराष्ट्रातील माता बांधवांनी एक घाव दोन तुकडे करून या शत्रूचा कधीच नायनाट केला असता. पण हा शत्रू दिसत नाही आहे, तीच पंचायत आहे. आणि हा शत्रू इतका विचित्र आहे की तो आपल्याच लोकांच्या माध्यमातून हल्ला करायला बघतोय.

जसं जसं आपल्याला शक्य होत आहे, तसं तसं आपण सोयी सुविधा वाढवतो आहोत. काल संध्याकाळपर्यंत साधारणतः ६६,७९६ टेस्ट झालेल्या आहेत. त्यामध्ये किमान ९५% व्यक्तींच्या टेस्ट नेगेटीव्ह आलेल्या आहेत. साधारणतः ३६०० रुग्ण पॉझिटीव्ह आलेले आहेत.

एकूण ३००-३५० रुग्णांना बरं करून आपण घरी सोडलं आहे. जेवढे पॉझिटीव्ह रुग्ण आपल्याला सापडत आहेत त्यात किमान ७०-७५% हे अतीसौम्य किंवा ज्यांना लक्षणे नाहीत या वर्गात मोडतात. आपल्याकडे ५२ रुग्ण थोडे, मध्य व अती गंभीर या वर्गात मोडतात. आपलं लक्ष हे गंभीर आहेत त्यांना वाचवण्याचे आहे.

आपल्याला सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे दिसत असतील तर लोकं वाळीत टाकतील का? अशा संस्कृतीचा महाराष्ट्र नाही आहे. एकमेकांना मदत करणारी आपली संस्कृती आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो जर का कोणाला अशी लक्षणे आढळली तर न घाबरता, न पळता घरी न राहता तुम्ही फिव्हर क्लिनिक मध्ये जा.

कोरोना झाला म्हणजे संपल असं नाही. काही ठिकाणी गंभीर झालेली रुग्ण सुद्धा आपण बरं करून घरी सोडले आहेत. ६ महिन्यांच्या बाळापासून ८५ वर्षांच्या आजींपर्यंत रुग्ण बरे होत आहेत, पण वेळेमध्ये आले तर.

काल संध्याकाळी मी मुंबईतील खाजगी दवाखाने, हॉस्पिटल्स, स्वतः प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांशी बोललो, मला समाधान आहे की हेसुद्धा कुठेही लढायला कमी नाहीत. सर्वांनी आपल्याला आश्वासन दिले आहे की जे नॉन कोविड पेशंट आहेत, त्यांच्यावर उपचारासाठी हे दवाखाने कोणत्याही परिस्थितीत चालू राहतील.

मी संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर्सना आवाहन, विनंती करतो की मुंबईतील डॉक्टर्स तयार झाले आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा तयार होत आहेत, पण आता घाबरु नका. तुम्हाला जे जे हवं आहे, जे जे सरकार म्हणून करता येणे शक्य आहे ते सर्व सरकार म्हणून आम्ही करतो आहोत.

धान्याच्या बाबतीत जवळपास ८०-९०% लोकांपर्यंत आपण रेशन पोहोचवलं आहे. भगव्या रेशन कार्डबाबत राज्याने जो निर्णय घेतला त्याप्रमाणे येत्या काही दिवसात वाटप सुरू होत आहे. आपल्या त्यांना सवलतीच्या दराने धान्य देतोय.

केंद्र सरकार मोफत तांदूळ देत आहे, आणि तांदूळ हे अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठी आहे. जसं जसं तांदूळ येत आहे, आपण वाटत आहे. तांदूळ सोबत डाळ आणि गव्हाची मागणी आपण केली आहे.

गेल्या काही दिवसांमधील आकड्यांमध्ये घट होत आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांतील आकड्यांची मी पुन्हा तपासणी करायला सांगितली आहे कारण कुठेही भ्रमात आपण राहू नये. जगभराचा अनुभव घेतला तर त्याची वाढ वर-खाली होते. हे आकडे खाली येईल आणि वर जास्त जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे.

जे काही सगळं ठप्प झालेलं आहे, अर्थचक्र जे कोरोनाच्या चिखलात रूतलं आहे, अर्थचक्र आपल्याला फिरवायला पाहिजे, नाही तर आपण कोरोनातून बाहेर पडू आणि आर्थिक संकटात पडू. त्यासाठी २० एप्रिलपासून ‘गणपती बाप्पा मोरया’ करून काही ठिकाणी आपण मोजक्या आणि माफक स्वरुपात परवानगी देत आहोत.

आपण थोडे झोन केले आहेत; रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन. जिथे रुग्णांच्या संख्येत वाढ होते ते रेड झोन, जिकडे रुग्ण आहेत पण नवीन वाढ झाली नाही आहे तो ऑरेंज झोन आणि जिथे शून्य रुग्ण आहेत ते ग्रीन झोन. खासकरून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आपण माफक स्वरुपात उद्योगधंद्यांना परवानगी देत आहोत.

शेती आणि कृषीमध्ये आधीही बंधन नव्हतं आता ही राहणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, उत्पादनमध्ये कुठेही अडचण येणार नाही. इतरही गोष्टींची वर्गवारी केली आहे. केंद्राकडून सुद्धा आज सूचनांची नियमावली आली आहे, त्याप्रमाणे सुद्धा होणार आहे.

जिल्ह्यांच्या वेशी आपण उघडत नाही आहोत. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जायला आपण परवानगी दिलेली नाही. फक्त माल वाहतूक होत राहील, आपण घरातच राहायचं आहे. किमान ३ मे पर्यंत तरी हे बंधन आपल्याला पाळायचे आहे.

ज्यांच्या मनासारखं होतय,ते आशीर्वाद देतात, माझं कौतुक करतात. काहींच्या मनासारखं होत नाही,ते माझ्यावर रागावले असतील.मी माझ्या पत्रकार बांधवांना सांगतोय, वृत्तपत्रांवर बंदी नाही. वृत्तपत्र स्टॉलवर उपलब्ध करायला हरकत नाही पण रेडझोन आहे तिथे घरोघरी वृत्तपत्र टाकू देणं योग्य वाटत नाही

मला कोणी वाईट म्हणतील, म्हणू देत. मी महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे. जर माझ्या महाराष्ट्राचं भलं होणार असेल आणि त्यासाठी मी वाईट ठरणार असेल तर मी वाईटपणा घ्यायला तयार आहे. जसं तुम्ही माझं कौतुक करता, तसचं मी वाईटपणा सुद्धा स्वीकारायला तयार आहे.

आजपर्यंत जसं तुम्ही मला सहकार्य केले, सहकार्य हे मला नाही, आपण आपल्या स्वत:ला सहकार्य करतोय. आजपर्यंत या रोगावर औषध, लस आलेली नाही, प्रयोग सुरू आहेत. आतातरी यापासून लांब राहणे हा एवढाच उपाय आपल्याकडे आहे.

मला मेसेज येत आहेत की लहान मुले आपल्या वाढदिवसाचे पैसे, आपल्या खेळण्यासाठी, सायकल साठी साठवलेले पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला देत आहेत. काय बोलायचं या मुलांना? कौतुक केलेच पाहिजे, आशीर्वाद दिलेच पाहिजे. मी बाळगोपाळांना सांगतो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत.

CSR फंड साठी आपण वेगळा अकाऊंट सुरू केला आहे. ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला CSR म्हणून निधी द्यायचा आहे त्यांना आपण CSR साठी वेगळा अकाऊंट उघडून दिला आहे.

घराघरात महिलांवर अत्याचार किंवा हिंसाचार या गोष्टी वाढत आहेत. महाराष्ट्रात असं होणार नाही. एक सुद्धा केस अशी होता कामा नये. पण महिलांना मी विनंती करतो की दुर्दैवाने आपल्याला असा अनुभव आला तर १०० नंबर हा आपल्या मदतीसाठी आपण केला आहे.

इतके दिवस घरी राहिल्यानंतर मन अशांत होणार, बेचैनी, एकटेपण वाटणार, थोडं वैफल्य वाटणार. त्यासाठी सरकारने २ नंबर दिले आहेत:

मुंबई महापालिका व बिर्ला यांनी सेवा दिली आहे: १८०० १२० ८२००५०

आदिवासी विभाग, प्रोजेक्ट मुंबई व प्रफुल्ला संस्था यांनी मिळून सेवा सुरू केली आहे: १८०० १०२ ४०४०

३ मे पर्यंत बाकी सगळ्या गोष्टी तशाच बंद राहतील. कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम हे महाराष्ट्रामध्ये होणार नाही. कोणत्याही प्रकारची रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक महाराष्ट्रात होणार नाही.

इतर राज्यातील मजुरांसाठी बोलतो, केंद्र सरकार के साथ बात चल रही है, आनेवाले दिनोंमें रास्ता निकल आएगा, आप चिंता मत करो। महाराष्ट्र में हम काम शुरू करने जा रहे है,संभव है तो कामपर लौट आइए। जिस दिन ये माहौल ख़तम होगा,मैं आपको वचन देता हूं, महाराष्ट्र सरकार आपको आपके घर तक पहुंचाएगी।

लढायचंच आणि जिंकायचंच!
जय हिंद, जय महाराष्ट्र!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button