breaking-newsआंतरराष्टीय

मुंबई हल्ल्यातील आरोपी राणाला भारताच्या ताब्यात देणार

वॉशिंग्टन – मुंबईतील २००८च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असलेला पाकिस्तानी कॅनेडियन दहशतवादी तहव्वुर हुसेन राणा याला अमेरिकेत २०२१ पर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा संपण्याच्या आधीच भारताच्या ताब्यात दिले जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. राणा (वय ५८) हा शिकागोचा रहिवासी असून त्याला २००९ मध्ये २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात कट आखल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती.

राणा हा जन्माने पाकिस्तानी असला तरी तो कॅनडाचा नागरिक आहे. त्याला अमेरिकेत संघराज्य न्यायाधीशांनी डॅनिश वृत्तपत्राच्या विरोधात कट व लष्कर ए तोयबाला साहित्य पुरवल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते.

मुंबईत २००८ मध्ये झालेल्या हल्ल्यात सहा अमेरिकी नागरिकांसह एकूण १६६ जण ठार झाले होते. एकूण नऊ दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार मारले. अजमल कसाब हा जिवंत पकडला गेला होता. त्याला नंतर भारतीय न्यायालयात सुनावणीनंतर फाशी देण्यात आले.

२०१३ मध्ये राणा याला १४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याची डिसेंबर २०२१ मध्ये सुटका केली जाणार आहे. भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न चालवले असून डिसेंबर २०२१ मध्ये तुरुंगवास संपण्यापूर्वीच त्याला भारताच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे.

अमेरिकी न्यायव्यवस्थेनुसार एका व्यक्तीला एकाच गुन्ह्य़ासाठी दोनदा शिक्षा करता येत नाही, त्यामुळे भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी वेगळे आरोप ठेवले आहेत. दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय व अनेक शहरांतील छबाड गृहे येथे हल्ल्यांचा कट आखल्याच्या आरोपावरून भारताने त्याचे प्रत्यार्पण मागितले आहे. त्याला भारताच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यासाठी कागदपत्रांचे काम पूर्ण करावे लागणार असून दोन्ही देशातील प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. काही गुंतागुंतीच्या प्रक्रिया कमी करून राणा याला डिसेंबर २०२१ च्या आधीच भारताच्या ताब्यात देण्यावर एनआयए पथकाने अमेरिकी अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेत मतैक्य झाले होते.

ट्रम्प प्रशासनानेही राणा याला वेळेत भारताच्या ताब्यात देण्यास सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button